। नांदेड । प्रतिनिधी ।
रिल बनवण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि.18) सायंकाळी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात येणाऱ्या किवळा येथे घडली. शेख बाबर शेख जाफर (15) आणि महमद रेहान महमद युसुफ (15) अशी मृतांची नावे आहेत. याची माहिती मिळताच सोनखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जीवनरक्षक दलाच्या मदतीने मृतदेह शोधून काढले आणि रात्रीच्या सुमारास दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन नांदेडातील बळीरामपूर येथील शेख बाबर शेख जाफर आणि जुन्या नांदेडातील उमर कॉलनी, देगलूर नाका येथील महमद रेहान महमद युसुफ हे दोघे गुरुवारी लोहा तालुक्यातील किवळा साठवण तलाव येथे फोटो शूट आणि रिल बनवण्यासाठी गेले होते. या दरम्यान त्यांचा पाय घसरून ते किवळा साठवण तलावाच्या सांडव्याच्या पाण्यामध्ये बुडाले. सायंकाळी जवळपास पाच वाजता घडलेल्या या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सोनखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जीवरक्षक दलाच्या मदतीने तलावात दोन्ही मुलांचा शोध घेतला. दोघांचेही मृतदेह रात्री तलावातून बाहेर काढण्यात आले. याप्रकरणी सोनखेड ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.






