माथेरानमध्ये आणखी दोन ई-रिक्षा

आजपासून सात रिक्षांमधून प्रवासी वाहतूक
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या शहरात पर्यावरणपूरक ई रिक्षा राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावरील वाहतुकीला 5 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, सात ई रिक्षा चालविण्यास परवानगी देण्यात आली असून, त्यातील पाच ई रिक्षांमधून 5 डिसेंबरपासून प्रवास सुरू करण्यात आला होता.त्यानंतर आज 20 डिसेंबरपासून आणखी दोन ई रिक्षांनी प्रवासी वाहतूक सुरू केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य सरकारने माथेरानमध्ये पर्यावरणपूरक वाहने चालविण्यास सुरुवात केली आहे. 5 डिसेंबरपासून माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेकडून ई रिक्षा चालविण्यास सुरुवात झाली असून, राज्य सरकारने तीन महिने सात ई रिक्षांची वाहतूक प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे. मात्र ई रिक्षा मधून प्रवासी वाहतूक सुरू झाली त्यावेळी मंजूर असलेल्या सात पैकी पाच ई रिक्षांची प्रवासी वाहतूक सुरू केली होती.गेली 15 दिवस सकाळी सहा ते नऊ या काळात शालेय विद्यार्थ्यांसाठी सेंट झेवियर्स स्कूल आणि प्राचार्य गव्हाणकर विद्यालय अशी वाहतूक सुरू ठेवली आहे.

त्यानंतर सकाळी नऊ ते रात्री सात पर्यंत स्थानिक नागरिक, वृध्द यांच्यासाठी प्रवासी वाहतूक सुरु ठेवली आहे. दुपारी शाळा सुटण्याच्या वेळी पुन्हा विद्यार्थ्यांच्या दिमतीला ई रिक्षा चालविली जाते. शनिवार आणि रविवारी रात्री दहापर्यंत ई रिक्षा चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्या ई रिक्षांसाठी तशी वेग मर्यादा 20 निश्‍चित करण्यात आली असून, माणसांची गर्दी असेल तेथेच हॉर्न वाजवून पुढे प्रवास करण्याचे आदेश रिक्षा चालक यांना देण्यात आले आहेत.

Exit mobile version