| मुंबई | प्रतिनिधी |
कांदिवली पूर्व आकुर्ली येथील एकमजली दुकानात 24 सप्टेंबर रोजी झालेल्या सिलिंडर स्फोटात होरपळलेल्या आणखी दोन महिलांचा आज मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृत महिलांची संख्या सहावर गेली आहे.
शिवानी केटरिंगमध्ये एका गॅस सिलिंडरमधून बराच काळ गॅस गळती होत होती. परंतु, केटरिंग युनिटच्या लोकांनी गॅस सिलिंडर उलटा करून तो पाण्याने भरलेल्या टबमध्ये टाकला आणि त्यांचे काम सुरू ठेवले आणि ही घटना घडली. कटर्सचे काम सुरू असताना झालेल्या या दुर्घटनेत होरपळलेल्या सहाही महिलांचा मृत्यू झाला आहे. मात्र, एक जखमी पुरुष मनाराम कुमाकट (55) यांना वेळीच उपचार झाल्याने ते बचावले आहेत. त्यांच्यावर ऐरोली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत जखमी कस्तुरबा रुग्णालयात दाखल रक्षा जोशी (47), ऐरोली येथील रुग्णालयात दाखल नीतू गुप्ता (31) आणि पूनम (28) अशा एकूण तीन महिलांचा रविवारी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला होता. तसेच ऐरोली येथील रुग्णालयात जखमी अवस्थेत उपचार घेणाऱ्या चार जणांपैकी एक शिवानी गांधी (51) या महिलेचाही सोमवारी मृत्यू झाला. तर ऐरोली येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जानकी गुप्ता (39) आणि दुर्गा गुप्ता (30) या दोन महिलांचादेखील आज मृत्यू झाला.






