अहमदनगरमधून दोन निलेश लंके रिंगणात

। अहमदनगर । वृत्तसंस्था ।

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपने पुन्हा एकदा सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून निलेश लंके निवडणुकीच्या रिंगणात आहे. आता अहमदनगर लोकसभेची निवडणूक दोन निलेश लंके लढवणार आहेत. अहमदनगरमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निलेश साहेबराव लंके यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे निलेश लंकेंना मतदान करणार्‍या मतदारांची चांगलीच धांदल उडणार असल्याचे चित्र आहे. यावरुन महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत भाजपचे उमेदवार सुजय विखेंवर निशाणा साधला आहे. डमी राजकारण करण्याची विखेंची परंपरा आहे, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केली आहे. दरम्यान, अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ उडाल्याचे दिसून आले. नगरमधून शेवटच्या दिवशी 27 उमेदवारांनी 32 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. नामनिर्देशनपत्र दाखल करणार्‍या उमेदवारांची संख्या 43 वर पोहचली आहे.

Exit mobile version