। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्ह्यात साऊथ अफ्रिका आणि ओमान देशातून आलेल्या दोन प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत समोर आले आहे. माणगाव आणि खारघर या ठिकाणी हे दोन्ही रुग्ण वास्तव्यास आहेत. त्यांचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच त्यांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे का हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात ओमायक्रॉन हातपाय पसरणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा चांगलीच सतर्क झाली आहे. ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण साऊथ अफ्रिकेत सापडला होता. त्यानंतर ओमायक्रानचा जगभर वेगाने प्रसार झाला आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत 3339 नागरिक परदेशातून आले आहेत.(रायगड ग्रामिणमध्ये 1604 आणि पनवेल महपालिका हद्दीत 1535) परदेशातून आलेल्या 2519 नागरिक ट्रेस करण्यात आले आहे. (रायगड ग्रामिणमध्ये 1352 आणि पनवेल महपालिका हद्दीत 1197)परदेशातून आलेल्या 1879 नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 908 रायगड ग्रामिणमधील तर 971 पनवेल महापालिका हद्दीतील आहेत. पैकी रायगड ग्रामिणमध्ये माणगाव तालुक्यात एक आणि पनवेल महापालिका हद्दीतील खारघर येथे एक अशा दोन नागरिकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे जिल्ह्याती चिंता वाढली आहे. रायगड ग्रामिण भागातील माणगाव येथे ओमान राष्ट्रातून महिला आली आहे. तीचे वय 25 वर्ष आहे. तीच्या सोबत अन्य दोन व्यक्ती होत्या.
या महिलेने फायझर कंपनीचे दोन्ही डोस घेतले आहेत. पहिला डोस 19 जुन 21 तर दुसरा डोस 8 ऑगस्ट 21 रोजी घेतला आहे. सदरची महिला पाच महिन्यांची गरोदर आहे. सात दिवसांनंतर तीची आरटीपीसीआर टेस्ट केल्यावर ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. पनवेल महापालिका हद्दीतील खारघर येथे आलेली व्यक्ती हा पुरुष आहे. त्यांचे वय 48 आहे. साऊथ अफ्रिका नंतर युके असा प्रवास करत भारतात आला आहे. त्यांनीही कोव्हिशिल्डचे दोन्ही डोस पूर्ण केलेले आहेत. पहिला डोस 6 एप्रिल 21 तर दुसरा डोस 18 जुलै 21 रोजी घेतला होता. त्याची सात दिवसांनतर आरटीपीसीआर तपासणी केल्यावर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघड झाले आहे. दोघांचेही नुमने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच ओमायाक्रॉनची लागण झाली आहे का हे स्पष्ट होणार आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या 20 जणांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली आहे. त्याचा अहवाल आलेला नाही, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांनी दिली.