देशी बनावटीच्या बंदुकांसह दोन जणांना अटक

| मुंबई | प्रतिनिधी |

माजी राज्यमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना 12 ऑक्टोबर रोजी मुंबईती वांद्रे येथे घडली होती. या घटनेनंतर सदर प्रकरणातील एकूण 10 जणांना अटक केली असून मुंबई क्राइम ब्राँच याप्रकरणी कसून चौकशी करत आहे. यादरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
 

मुंबईतील भांडुप परिसरातून दोन बंदुका आणि 6 जिवंत काडतुसांसह दोघांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही बंदुका देशी बनावटीच्या असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्त माहिती मिळाल्यानंतर प्रथम एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडून देशी बनावटीचे बंदूक सापडले. यानंतर चौकशीदरम्यान आणखी एका व्यक्तीची माहिती मिळाली, त्यानंतर त्यालाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडून आणखी एक देशी बनावटीचे बंदूक सापडले. दोन्ही देशी बनावटीचे पिस्तूल या आरोपींना तिसऱ्या व्यक्तीने दिले होते. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबईत शस्त्रे कुठून येत आहेत?, असा प्रश्न वरिष्ठांनी उपस्थित केला होता आणि गुन्हे शाखेसह सर्व पोलीस ठाण्यांना आणखी दक्षता वाढवण्यास सांगितले होते. यानंतर मुंबई पोलिसांकडून विविध चौकशी करण्यात येत आहे. 

Exit mobile version