सहा लाख रुपयांची लाच घेताना पकडले रंगेहाथ
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
मोजणीचे ‘क’ पत्र देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी भूमीलेख विभागातील उपअधिक्षकांसह निमतानदार यांच्याविरोधात सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा लाख रुपयांची लाच घेताना त्यांना पकडण्यात आले आहे. अंगझडतीत त्यांच्याकडे वीस हजारहून अधिक रक्कम सापडली असून, त्यांची घरझडती सुरू केली आहे. नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा दणका भूमीअभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना बसला आहे.
तक्रारदार हे विकासक यांच्याकडे गेल्या तीन वर्षापासून काम करीत आहेत. नवी मुंबई इंटरनॅशनल एअर पोर्ट इन्फुलन्स एरिया (नैना) येथे विकासक यांनी भुखंड क्रमांक 27 खरेदी केला. खरेदी केलेल्या भुखंडाच्या मोजणी व इतर प्रशासकीय कामाच्या निमित्ताने अर्ज व इतर आर्थिक व्यवहाराबाबत काम पहाण्याचे अधिकार तक्रारदार यांना विकासकाने दिले होते. त्यानुसार तक्रारदार यांनी भूखंड मोजणीसाठी विकासक यांच्या नावे असलेला अर्ज भूमीलेख विभागातील जिल्हा अधीक्षक यांच्या कार्यालयात जमा केला. विकासक यांच्या नावे नोटीस देऊन तो भुखंड 3 डिसेंबरला मोजणीसाठी ठेवला असल्याचे भूमी अभिलेख विभागाककडून कळविण्यात आले.
पाच डिसेंबरला त्या भूखंडाची मोजणी झाली. त्यानंतर मोजणीचे रिपोर्ट घेण्यासाठी तक्रारदार गेले. त्यावेळी उपअधीक्षक दिलीप बागुले यांनी मोजणीचे क पत्र देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार यांनी नवी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्याकडे 15 डिसेंबरला तक्रार केली. घटनेचे गांभीर्य ओळख धर्मराज सोनके यांनी कारवाई सुरु केली. पडताळणी करून सापळा रचला. मंगळवारी (दि. 16) सहा लाख रुपयांची लाच घेताना दिलीप बागूले यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तसेच लाच देण्यासाठी तक्रारदार यांना प्रोत्साहन दिल्याने निमतानदार कलिमोद्दीन रियाजोद्दीन शेख तसेच उप अधीक्षक दिलीप बागुले यांच्याविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला. दोघांच्या घराची झडती या विभागाने सुरू केली आहे.






