| रायगड | प्रतिनिधी |
रायगडचा वनविभाग सध्या समस्यांच्या पिंजऱ्यात अडकला आहे. तो आला, त्यानं पाहिलं, दहशत माजवली आणि तो गेला… हा संपूर्ण प्रकार अलिबागचा वनविभाग आणि पोलीस पाहात होते. बिबट्या समोर दिसतो आहे. अशावेळी वन विभागाकडे त्या दहशत माजविणाऱ्या बिबट्याला पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी लागणारी यंत्रणा नव्हती, हे विशेष. संपूर्ण दिवसभर बिबट्याने नागावमधील परिसरात मुक्तसंचार केला. बिबट्याला पकडण्यासाठीची यंत्रणा आली खरी; पण तोपर्यंत अंधार पडू लागल्याने बिबट्याने स्वतःसाठी सुरक्षित जागा शोधली आणि गायब झाला. पोलीस प्रशासन आणि वन विभाग यांचे बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न फेल गेल्याने नागाव ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले होते.
मंगळवारी (दि.9) गावातून पळालेला बिबट्या बुधवारी परिसरात दिसेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु, ही शक्यतादेखील बिबट्याने फोल ठरवली. यामुळे हळूहळू नागाव रुळावर आले. परंतु, शुक्रवारी(दि. 12) बिबट्या आक्षी- साखरमधील एका चहाच्या दुकानात घुसून एकावर हल्ला केलाने पुन्हा दहशद माजली. नागाव परिसरात दिसलेल्या बिबट्यामुळे स्थानिकांमध्ये निर्माण झालेली भीती अद्यापही कायम आहे.
बिबट्यासह रानडुक्कर, वानर, हरीण व अन्य प्राणी नागरी वस्तीत शिरतात तेव्हा त्यांना पकडण्यासाठी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडते. सध्या या विभागाकडे ना पिंजरे, ना गाड्या, ना डॉक्टर, ना पुरेसे कर्मचारी, ना गन. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम करणे मुश्कील झाले आहे. वनविभागाला जाणवत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी सरकार कोणतेही प्रयत्न गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वनखात्याचा कारभार ना घर का ना घाट का असा झाला आहे.
वनविभागाच्या जमिनींवरील वाढत्या मानवी अतिक्रमणामुळे वाघ, बिबटे, हरणे, रानडुक्कर, ससे, वानर, माकडे आणि अन्य विविध प्रकारांतील वन्यजीव आता भक्ष्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरी वस्त्यांमध्ये शिरू लागले आहेत. वन्यजीव कायद्यात दुर्मिळ वन्यप्राण्यांना सरंक्षण दिलेले आहे. त्यामुळे असे दुर्मिळ वन्यजीव नागरी वस्तीत आल्यास त्याला पकडून सुरक्षितरीत्या पुन्हा जंगलात सोडण्यासाठी वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
वन्यजीव पकडण्यासाठी वनविभागाकडे पिंजरे नाहीत. यंदा कदाचित पिंजरा उपलब्ध झालाच तर पिंजरा वाहतुकीसाठी वनविभागाकडे कोणतेही वाहन नाही. वाहनच नसल्याने पिंजरा वाहतुकीसाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना इतरांकडे आर्जवे करावी लागतात. कधी-कधी अधिकाऱ्यांना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करण्याची वेळ येते. वनविभागाकडे माकड, वानर, वाघ, बिबट्याला पकडण्यासाठी भुलीचे इजेक्शन देणाऱ्या पुरेशा गन नाहीत. वन्यजीवाला पकडल्यास दुर्मिळ प्राण्याचे स्वास्थ तपासणीसाठी पुरेशा प्रमाणात डॉक्टर्स नाहीत.






