| पनवेल | प्रतिनिधी |
कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या काही तासांच्या अंतराने घडलेल्या दोन भीषण रस्ते अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही अपघातांनंतर संबंधित अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाले असून, कळंबोली पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पहिली घटना केंद्रीय वखार महामंडळ येथील स्टील मार्केट रोडवर घडली. कळंबोली येथे राहणारे अमित साईनाथ पवार (37) हे दुचाकीवरून कळंबोली सर्कलकडे जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रेलरने त्यांच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे अमित पवार यांचा तोल जाऊन ते थेट ट्रेलरच्या मागील चाकाखाली आले. या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातानंतर ट्रेलरचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.
याच रात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास दुसरी घटना एक्स्प्रेस-वेकडे जाणाऱ्या मार्गावर देवांशी इन हॉटेलसमोर घडली. अंदाजे 40 ते 45 वर्षे वयोगटातील एका अनोळखी व्यक्तीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडकेनंतर संबंधित व्यक्ती वाहनाच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच कळंबोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी व्यक्तीला पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून त्याबाबत पोलीस तपास करीत आहेत. या दोन्ही अपघातांप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून फरार वाहनचालकांचा शोध सुरू आहे. तसेच दुसऱ्या अपघातातील मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्नही पोलीस करीत आहेत.
कळंबोलीत दोन भीषण अपघात; दोघांचा मृत्यू
