दोन एसटी बसची समोरासमोर धडक; प्रवासी जखमी

। महाड । प्रतिनिधी ।

महाड- दापोली राज्य मार्गावरील कुर्ला दिवेकर वाडी येथे दोन एसटी बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या 14 प्रवाशांसह दोन्ही एसटी बसचे चालक व वाहक किरकोळ जखमी झाले असून, त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाड एसटी आगारातून महाड- मुमुर्शी- मंडणगड ही बस महाडकडून मंडनगडच्या दिशेने जात होती. कुर्ला दिवेकरवाडी येथील वळणावर समोरून येणाऱ्या फाळकेवाडी-मुंबई एसटी बसशी तिची समोरासमोर धडक झाली. या दोन्ही बसमधून प्रवास करणाऱ्या 14 प्रवाशांसहित दोन्ही एसटी बसचे चालक व वाहक यांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात विठ्ठल बरकडे , राधिका साकडे, प्रियांका सकपाळ, गोपाळ सकपाळ, सुरेखा भोसले, प्राची सकपाळ, प्रतीक भोसले, शितल वाघमारे, तारा पवार, वैशाली कांबळे, प्रगती कासारे, कृष्णा साखरे, रुपेश लुसते, दिलीप उन्हाळे या प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याने महाड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version