| वर्धा | प्रतिनिधी |
धानोरा-भोयगाव मार्गावरील वर्धा नदीत तीन युवक बुडाले. यातील एकाला वाचविण्यात यश आले, तर दोघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.15) सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली आहे. मृतांमध्ये संध्या शिंदे (20) रा. वणी, ता. जिवती आणि युगल नागपुरे (19) रा. सोनापूर देशपांडे ता. गोंडपिपरी यांचा समावेश आहे.
सविस्तर वृत्त असे की, चंद्रपूर शहरात आदर्श अकादमी आहे. येथे जिल्ह्यातील अनेक युवक-युवती पोलिस भरतीच्या परीक्षेची तयारी करतात. रविवारी (दि.15) आदर्श अकादमीचे संचालक काही विद्यार्थ्यांना घेऊन धानोरा-भोयगाव मार्गावर असलेल्या वर्धा नदीच्या पात्राकडे आले. तेथे काहीवेळ विद्यार्थ्यांनी व्यायामासह अन्य बाबींचा सराव केला. त्यानंतर काही विद्यार्थी अंघोळीसाठी नदीच्या पात्रात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे संध्या शिंदे आणि बाबूपेठ येथील समीक्षा शेंडे दोघी पाण्यात बुडत असल्याचे बघून युगल नागपुरे याने पाण्यात उडी घेतली. मात्र, तो बुडाला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने बाबूपेठ येथील समीक्षा शेंडे हिला पाण्याबाहेर काढण्यात यश आले. दरम्यान युगल नागपुरे याचा मृतदेह शोध मोहीमेदरम्यान मिळाला, तर संध्या शिंदे हिचा अद्याप शोध लागला नाही. घुग्घुस पोलिस आणि बचाव पथकाची शोधमोहीम सुरू होती.