तळा दगडी शाळेत दोन शिक्षक देतात 101 विद्यार्थ्यांना धडे

। तळा । वार्ताहर ।
तळा येथील दगडी शाळेत प्राथमिक शिक्षणाचा दर्जा अतिशय उत्तम असल्याने पालक आपल्या मुलांचे याच शाळेत प्रवेश घेत आहेत. परंतु या शाळेत शिक्षकांची कमतरता भासून येत आहे. अवघे दोन शिक्षक 101 विद्यार्थ्यांना शिकविताना येथे पहावयास मिळत आहे.

रायगड जिल्हा परिषदेची प्राथमिक मराठी मुलांची शाळा (दगडी शाळा) केंद्रीय शाळा आहे. मध्यंतरी ही शाळा बंद पडायच्या मार्गावर असतानाच मराठी शाळा टिकल्या पाहिजेत या उदात्त हेतूने स्थानिक कमिटी माजी विद्यार्थी संघटनेने, तत्कालीन शिक्षकांच्या प्रयत्नाने या शाळेचा पट वाढविला. सध्या चालु वर्षात या शाळेत 101 विद्यार्थी शिकत आहेत. परंतु शाळेचा पट संख्येत वाढ झाल्यावर शिक्षक संख्येतही वाढ होणे अपेक्षित होती, परंतु सुरूवाती पासून आजपर्यंत या शाळेत दोनच शिक्षक असून ते ज्ञानदानाचे काम करीत आहेत. याबाबत अनेकवेळा पालकांनी शिक्षण विभागाकडे कैफीयत मांडली आहे. लेखी मागणी तालूकाप्रशासनजिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे केली गेली आहे. परंतु अजूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. तरी जिल्हा परिषद शिक्षण विभाग सभापती, मा.मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड यांनी त्वरीत लक्ष घालावे अशी विनंती पालक, माजी विद्यार्थी संघटना, स्थानिकांकडून केली जात आहे.

Exit mobile version