महसुलात 10.85 कोटींची भर
| रायगड | प्रतिनिधी |
शालेय सहलींसाठी नोव्हेंबरमध्ये तब्बल 2,243 बस राज्याच्या विविध आगारांतून देण्यात आल्या. त्यातून महामंडळाला 10 कोटी 85 लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. एसटी महामंडळाने यंदा शालेय सहलींना नवीन बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम शालेय सहलींवर झाला आहे.
दरवर्षी विद्यार्थ्यांच्या शालेय सहलीला एसटी महामंडळ बस उपलब्ध करून देते. शासनाने एसटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शालेय सहलीला 50 टक्के सवलत दिली आहे. यंदा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी शालेय सहलीसाठी नवीन बस उपलब्ध करून देण्याच्या सूचना स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या होत्या. नव्या कोऱ्या एसटीतून राज्यभरातील हजारो विद्यार्थी गड-किल्ले, नयनरम्य समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे यांच्या सहलीला जाऊ लागली. नोव्हेंबरमध्ये तब्बल 2,243 एसटी बसमधून सुमारे 1 लाख विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहलीचा आनंद घेतला. एसटीच्या 31 विभागांपैकी कोल्हापूरने 375 एसटी बस शालेय सहलीसाठी उपलब्ध करून देऊन सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवून 1 कोटी 77 लाख रुपयांचा महसूल मिळवला आहे. त्यानंतर सांगली (211 बस) व रत्नागिरी (201 बस) यांनी चांगली कामगिरी केली.
डिसेंबर आणि जानेवारीतदेखील विविध शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थ्यांना सहलीसाठी नव्या बस उपलब्ध करून देण्याचे एसटी महामंडळाचे नियोजन आहे. स्वस्त, सुरक्षित आणि आनंददायी सहलीसाठी सर्व शाळांनी एसटीच्या बसेस आरक्षित कराव्यात.
– प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री







