प्रत्येकी दोन हजार रुपये भाऊबीज भेट जाहीर
| रायगड | प्रतिनिधी |
राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीसांना सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये भाऊबीज भेट देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
या रकमेच्या वितरणासाठी महिला व बाल विकास विभागाने 42 कोटी 81 लाख 94 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. 14 ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असून, भाऊबीज भेट तातडीने अदा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महिला व बाल विकास विभागाने जारी केलेल्या या निर्णयामुळे राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या बालकांचे पोषण, आरोग्यविषयक जागृती आणि बालविकासाशी संबंधित विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या कामाची दखल घेऊन दरवर्षी दिल्या जाणाऱ्या भाऊबीज भेटीच्या अनुषंगाने यंदाच्या आर्थिक वर्षासाठी निधी मंजूर करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांनी 4 सप्टेंबर रोजी सादर केलेल्या प्रस्तावाच्या आधारे ही मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
राज्यात 1,08,627 अंगणवाडी सेविका आणि 1,05,470 अंगणवाडी मदतनीस आहेत. त्यामुळे, दोन्हीची एकूण पदसंख्या 2,14,097 एवढी कार्यरत आहे. या सर्व कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रत्येकी दोन हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. त्यासाठी 42 कोटी 81 लाख 94 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यंदाची अंगणवाडी सेविका, मदतनीसांची दिवाळी आनंदात जाणार आहे.
वित्त विभागाची सहमती
वित्त विभागाने 16 सप्टेंबर रोजी दिलेल्या अनौपचारिक संदर्भातील सहमतीनुसार हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.या निर्णयामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना सणासुदीच्या काळात आर्थिक मदत उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तथापि, प्रत्यक्ष वितरणाची तारीख शासन निर्णयात नमूद केलेली नसून, संबंधित यंत्रणेकडून पुढील कार्यवाही झाल्यानंतर पात्र कर्मचाऱ्यांना ही रक्कम मिळणार आहे.
निधी वितरणासाठी आयुक्त नियंत्रक अधिकारी
शासन निर्णयानुसार, भाऊबीज भेटीच्या वितरणासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई येथील आयुक्तांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. सन 2026-27 या आर्थिक वर्षात मंजूर केलेल्या तरतुदींमधून हा खर्च भागविण्यात येणार आहे. त्यासाठी पोषण आहाराशी संबंधित लेखाशीर्षाखाली 42 कोटी 81 लाख 94 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीच्या वितरणाची जबाबदारी संबंधित आयुक्तांवर सोपविण्यात आली असून, पात्र अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना भाऊबीज भेट वेळेत मिळावी, यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत.






