| मुंबई | वृत्तसंस्था |
मुंबईतील ॲन्टाॅप हिल या परिसरात धूळखात पडलेल्या एका कारमध्ये दोन चिमुकल्यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 7 वर्षांचा मुलगा साजीद आणि त्याची 5 वर्षांची बहीण मुस्कान अँटॉप हिल परिसरात आई-वडिलांसह रहात होते. बुधवारी (दि.24) दुपारी ते दोघे एकत्र खेळण्यास बाहेर पडले. मात्र बराच वेळ झाला तरी ते परत न आल्याने कुटुंबियांनी शोध सुरू केला. मात्र, ते काही सापडले नाहीत. त्यानंतर वडिलांनी ॲन्टाॅप हिल पोलिस ठाण्यात मुलं बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
दोन मुलं एकाच वेळी बेपत्ता झाल्याने पोलिसांनी तातडीने तक्रार नोंदवून घेत तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची झाडाझडती घेतली. मात्र, ही मुलं कुठेच दिसत नव्हती. मैदानात शोधत असताना अखेर मैदानामध्ये पार्क करून ठेवण्यात आलेल्या एका जुन्या कारमध्ये हे दोघेही बेशुध्दावस्थेत सापडून आले. त्यांना तात्काळ कारमधून बाहेर काढले आणि रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मुले कारमध्ये खेळत असताना त्यातच अडकली आणि गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. हा दुर्दैवी आणि तितकाच धक्कादायक प्रकार घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.







