महाड एमआयडीसीतील वायूगळतीचे दोन बळी

36 कामगार बाधित; इंडो अमाईन्स कंपनीत दुर्घटना

| महाड | प्रतिनिधी |

महाड एमआयडीसीतील इंडो अमाईन्स या रसायन कंपनीत शनिवारी 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता झालेल्या भीषण एचसीएल वायू गळतीच्या घटनेत रविवारी आणखी एक बळी गेला आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता दोनवर पोहोचला आहे. इंडो अमाईन्स कंपनीतील एका कामगाराचा कालच उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर आज कंपनीच्या समोरील विरल कंपनीत काम करणाऱ्या कल्पेश वांद्रे (31) रा. बोरगाव यांचा मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

काल झालेल्या वायू गळतीचा फटका केवळ इंडो अमाईन्सपुरता मर्यादित राहिला नाही. वारा आणि कंपनीच्या लोकेशनमुळे समोरील विरल कंपनीतील जवळपास 30 ते 35 कामगारांना या विषारी वायूची मोठ्या प्रमाणात बाधा झाली. त्यापैकी कल्पेश वांद्रे यांची प्रकृती सर्वात गंभीर होती. याच रस्त्याने प्रवास करणाऱ्या एका तरुणीला देखील अचानक वायूचा झटका बसला असून, ती सध्या खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. तिची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती आहे.

सकाळी घटनास्थळी महाड पोलीस प्रशासन, फॅक्टरी इन्स्पेक्टर आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी दाखल झाले असून, पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. मात्र “घोडा गेल्यावर तबेला बंद” अशीच ही कृती असल्याची तीव्र भावना स्थानिक नागरिकांमध्ये आहे. या घटनेनंतर महाड एमआयडीसी परिसरातील नागरिक प्रचंड संतप्त झाले आहेत. इंडो अमाईन्समध्ये यापूर्वीही अशा छोट्या-मोठ्या गळतीचे प्रकार होत असतात. फॅक्टरी इन्स्पेक्टर नियमित तपासणी करतात असं फक्त कागदावर दाखवतात. प्रत्यक्षात सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा थेट आरोप नागरिकांनी केला.

कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या या कंपन्यांना तात्काळ बंद करा. अधिकारी हातावर हात धरून बसतात आणि आम्ही मरतो. कल्पेशसारखे आणखी किती बळी जाणार? असा सवाल करत नागरिकांनी इंडो अमाईन्ससह परिसरातील सर्व धोकादायक रसायन कंपन्यांवर कारवाई करण्याची आणि त्या बंद करण्याची मागणी केली आहे.

एकीकडे अधिकृत आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न होत असताना, दुसरीकडे गळतीनंतर तातडीने परिसरातील कंपन्यांना अलर्ट न दिल्याने आणि बचाव यंत्रणा अपुरी असल्याने फॅक्टरी इन्स्पेक्टरच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या दुर्घटनेमागे कोण जबाबदार? फक्त कंपनी प्रशासन की त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेली शासकीय यंत्रणा? हा प्रश्न आज भयग्रस्त महाडकर विचारत आहेत.

घटनेनंतर प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत पवार आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रावडे यांनी घटनास्थळी भेट दिली. कंपनीविरोधातील चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच वायूगळतीबाबत कंपनी व्यवस्थापनाकडून चुकीची माहिती देण्यात आली असल्यास त्याचीही चौकशी करून कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

विशेष म्हणजे, रात्री गंभीर दुर्घटना घडूनही दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पोलिसांकडे घटनेची प्राथमिक माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापन आणि संबंधित यंत्रणांमधील समन्वयावरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेप्रकरणी अद्याप कंपनी प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे की नाही याबत स्पष्टता नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version