खांदा गावातील ‘दोन गाव एक गणपती’ परंपरा

दीडशे वर्ष जुने स्वयंभू श्री गणेश मंदिर

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल ग्रामीण (वा) तालुक्यातील धाकटा खांदा गावातील दीडशे वर्ष जुन्या स्वयंभु गणेश मंदिरात आजही दोन गाव एक गणपती प्रथा पाळली जात आहे. दोन गाव एक गणपती असलेले हे राज्यातील एकमेव ठिकाण आहे.

तालुक्यातील धाकटा खांदा आणि मोठा खांदा या गावात ही प्रथा पाळण्यात येत असून, गणेशोत्सव काळात गावातील कोणत्याही व्यक्तीने घरात गणेश मूर्तीची स्थापना केल्यास त्या कुटुंबातील व्यक्तींना विविध अडचणीचा सामना करावा लागत असल्याचा अनुभव काही ग्रामस्थांनी घेतला आहे. त्यामुळे दोन्ही ग्रामस्थांनी याठिकाणी दोन गाव एक गणपतीच्या परंपरेचा पायंडा पाडत गावातील दीडशे वर्ष जुन्या स्वयंभु श्री गणेश मंदिरातच गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात दोन्ही गावचे ग्रामस्थ मंदिरात एकत्र येत भजन, कीर्तन, भारुड, आदीसह परंपरागत बाल्या नृत्याचे कार्यक्रमांचे आयोजन मंदिरात करीत असतात. तसेच, या काळात ग्रामस्थानी स्थापन केलेल्या श्री गणपती देवस्थान ट्रस्टमार्फत ग्रामस्थांच्या भोजनाची व्यवस्था केली जाते. गणेशउत्सव काळात दोन्ही गावात गणेश स्थापना केली जात नाही. मात्र, या कालावधीत घरोघरी गौरीपूजन करण्याची परंपरादेखील गावकऱ्यांनी सांभाळली आहे.

दुसऱ्या दिवशी काढली जाते मिरवणूक
दोन्ही गावातील ग्रामस्थ एकत्र येत गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी गावात मिरवणूक काढतात. गावात वाजतगाजत काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत दोन्ही गावातील ग्रामस्थ भक्तिभावाने सामील होत उत्सवाचा समारोप करतात.
मंदिरात इतरही देवतांच्या मूर्ती
मंदिराबाबत सांगितल्या जाणाऱ्या अख्यायीकानुसार इंग्रज आमदानित देशात पसरलेल्या प्लेगमुळे भयभीत झालेल्या खांदा गावातील ग्रामस्थांनी गावापासून काही अंतरावर असलेल्या जंगलात नवीन गावं वसवण्याचा निर्णय घेतला. याकरिता केल्या जात असलेल्या सफासफाई दरम्यान ग्रामस्थांना त्या ठिकाणी डाव्या सोंडेच्या गणेश मूर्तीसोबत भवानी माता, श्री वेताळेश्वर महाराज, श्री वाघेश्वर महाराज, नंदी आदी पुरातन मूर्ती सापडल्याने ग्रामस्थांनी त्या ठिकाणी छोटेखानी मंदिर निर्माण केले. 1992मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.
Exit mobile version