। अलिबाग । प्रतिनिधी ।
साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजल्या जाणार्या गुढीपाडव्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. रायगड जिल्ह्यामध्ये रविवारी (दि. 30) गुढीपाडव्याच्या निमित्ताने पाचशेहून अधिक दुचाकी खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एका दिवसामध्ये दुचाकी खरेदीतून सुमारे आठ कोटींहून अधिक उलाढाल झाल्याची माहिती समोर आली आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला. या दिवशी काहींनी घर, जागा खरेदी केली. तर काहींनी सोने व इलेक्ट्रीक वस्तू खरेदी केल्या. गेल्या काही वर्षापासून या दिवशी दुचाकी खरेदी करण्याचा क्रेझ वाढला आहे. रविवारी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शोरुमध्ये वेगवेगळ्या सवलती निर्माण झाल्या होत्या. बजाज, होन्डा, चेतक अशा अनेक कंपन्यांची दुचाकी खरेदी करण्यात आली होती. जिल्ह्यामध्ये सुमारे 250हून अधिक होन्डा कंपनीच्या दुचाकी खरेदी करण्यात आल्या. त्यामध्ये अलिबागमधून शंभरहून अधिक दुचाकी खरेदी करण्यात आल्याची माहिती होन्डा शोरुमचे व्यवस्थापक नवीन झा यांनी दिली.
बजाज कंपनीची दुचाकीच्या शोरुममध्येदेखील दुचाकी खरेदी करण्यासाठी रविवारी गर्दी झाली होती. जिल्ह्यातून सुमारे तीनशेहून अधिक बजाज कंपनीच्या दुचाकी खरेदी झाल्या. त्यात अलिबाग शोरुमधून पेट्रोलवर चालणार्या 57 व सीएनजीवर चालणार्या 29 दुचाकी खरेदी झाल्याची माहिती देण्यात आली.
वेगवेगळ्या कंपन्यामधून सुमारे 550हून अधिक दुचाकी खरेदी झाल्या आहेत. यातून सुमारे 8 कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
चेतक, केटीएमला पसंती
चेतक कंपनीच्या दुचाकी जगप्रसिध्द आहेत. अलिबागमधील नमिता मोटर्समध्ये चेतक कंपनीच्या दुचाकी उपलब्ध आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने चेतक कंपनीच्या 36 दुचाकी आणि केटीएमच्या 4 दुचाकी खरेदी करण्यात आल्या आहेत. या दुचाकी खरेदीतून सुमारे 50 हून अधिक लाखाची उलाढाल झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे चेतकसह केटीएम दुचाकीला अधिक पसंती असल्याचे चित्र यातून आले आहे.