आदिवासी बांधवांनी श्रमदानातून नैसर्गिक झरे जिवंत केले
| आविष्कार देसाई | रायगड |
महाराष्ट्रात गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्र गुढी उभारून, शोभायात्रा काढून विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जात असताना, पेण तालुक्यात मात्र सामाजिक बांधिलकी जपत अनोख्या पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यात आले. ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील उंबरमाळ आदिवासी वाडीतील ग्रामस्थ व ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पाणीटंचाईवर मात करण्याचे ठरवले. त्यांनी श्रमदानातून नैसर्गिक झर्यांचे खोलीकरण करून जलस्त्रोतांचे बळकटीकरण करीत गुढीपाडव्याचा सण साजरा केला.
आदिवासी समाज नेहमीच प्रवाहापासून अलिप्त राहात असतो. जंगलांमध्ये राहात असल्याने त्यांना निसर्गाने भरभरुन दिलेले आहे. मात्र, अलीकडे विकासाच्या नावावर सर्वत्र सुरु असलेली झाडांची कत्तल, रेती, माती दगड उत्खनन, वाढते वायू, पाणी, ध्वनी प्रदूषण यासारख्या समस्येमुळे निसर्गाचे चक्र बिघडले आहे. याचा फटका आदिवासी समाजाला बसत आहे. मात्र, जगण्यासाठी ते कोणावर अवलंबून राहात नाहीत. याचसाठी त्यांनी पाणी समस्येवर मात करण्यासाठी पुढाकार घेतला.

सुमारे 125 च्या आसपास लोकसंख्या असलेल्या पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव हद्दीतील उंबरमाळ आदिवासी वाडीत एकच विहीर असून, त्यातील पाणीसाठा कमी झाल्याने येथील आदिवासी बांधवांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांची विशेष करुन महिलांची दमछाक होत आहे. हे लक्षात घेऊन ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांनी ग्रामसंवर्धनच्या कार्यकर्त्यांसह वाडीतील सर्व ग्रामस्थांना एकत्रित करीत वाडीच्या पाणीसमस्येबाबत उंबरामाळ वाडीत बैठक घेतली. त्या बैठकीतून आदिवासी बांधवांनी वाडीच्या खालच्या बाजूला साधारण पाचशे मीटर अंतरावर असलेल्या एका लहानशा झर्याला भरपूर पाणी असल्याचे सुचविल्यानुसार रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व ग्रामस्थ व ग्रामसंवर्धनच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानातून या झर्याचे खोलीकरण करण्याचे ठरविले आणि आदिवासी बांधवांच्या या प्रयत्नाला यश आले. या झर्याला भरपूर पाणी लागले असून, त्या ठिकाणी विहीर बांधल्यास वाडीच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटेल, असा विश्वास स्थानिक आदिवासी ग्रामस्थ यशवंत वाघमारे यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, राजू पाटील, सचिन पाटील, राजेश रसाळ, महेश पाटील, संजय वाघमारे, संतोष हिलम, सुनील वाघमारे, सतीश पवार, गीता वाघमारे, रेणुका हिलम, गणेश वाघमारे, नीलम पवार, कृष्णा गोगरेकर, विनायक पवार, कमली हिलम, महेंद्र हिलम, सुरेखा वाघमारे, सुमन पवार, रुक्मिणी घोगरेकर यांच्यासह उंबरमाळ वाडीतील सर्व ग्रामस्थ या श्रमदानात सहभागी झाले होते.