दुचाकीस्वाराची कारला धडक

| महाड | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गावरील नागलवाडी येथील पुलावर रविवारी (दि.25) रात्री 10 वाजताच्या सुमारास दुचाकीची व कारची समोरासमोर धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून, दुचाकीची अक्षरक्षः चिंधड्या उडाल्या आहेत. तर कारचालकही जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाड जवळील नागलवाडी फाटा येथील उड्डाण पुलावर स्कोडा कंपनीची कार चालक अमीर अहमद काझीम (22) हे गोव्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी दुचाकीस्वार दानिश इकबाल पालटे (40) हे विरुद्ध दिशेने वेगाने दुचाकी चालवत आले आणि अमीर काझीम यांच्या कारला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार दानिश पालटे हे गंभीर दुखापत झाल्याने त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. या अपघाताची घटना समजताच महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे, पोलीस हवालदार पवार, पोलीस शिपाई भोसले व शेळके यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी दूर करून महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याच्या सहकार्याने अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल केले.

Exit mobile version