उबेर बॅडमिंटन करंडक स्पर्धा

चीनकडून भारतीय महिलांचा पराभव

। चेंगडू । वृत्तसंस्था ।

भारतीय युवा महिला बॅडमिंटन संघाचा उबेर करंडकातील ‘अ’ गटातील अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत चीनकडून पराभव झाला. चीनने या लढतीत भारतीय संघावर 5-0 असा विजय साकारला. या विजयामुळे चीनच्या संघाने तीन गुणांसह पहिले स्थान पटकावले. भारताला दुसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले. चीन व भारत या दोन्ही संघांनी या गटातून बाद फेरीत प्रवेश केला आहे. याच गटातील अन्य लढतीत कॅनडाने सिंगापूरचा 5-0 असा धुव्वा उडवला व तिसरा क्रमांक पटकावला.

चेन यू फेई हिने एकेरीच्या पहिल्या लढतीत इशरानी बरुआ हिला 21-12, 21-10 असे पराभूत करीत चीनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर चेन किंग -जिया फॅन या जोडीने प्रिया के. – श्रुती मिश्रा या भारतीय जोडीला 21-13, 21-12 असे सहज नमवले. हॅन युई – अनमोल खरब यांच्यामध्ये एकेरीची दुसरी लढत रंगली; पण 9-21, 1-4 अशा पिछाडीवर असताना अनमोल हिने दुखापतीमुळे माघार घेतली. त्यामुळे चीनला 3-0 अशी विजयी आघाडी घेता आली.

परतीच्या दुहेरीच्या लढतीत सिमरन सिंघी रितिका ठाकेर या भारतीय जोडीला पराभवाचा सामना करावा लागला. लिऊ शू – टॅन निंग या जोडीने भारतीय जोडीला 21-9, 21-10 असे सरळ दोन गेममध्ये पराभूत केले. अखेरच्या लढतीत तन्वी शर्मा हिलाही विजय मिळवता आला नाही. वँग यी हिने तन्वी हिच्यावर 21-7, 21-16 अशी मात केली.

माझ्या खेळावर मी नाराज आहे. माझ्याकडून खूप चुका झाल्या. चेन फेई हिने छान खेळ केला. माझ्यासाठी ही लढत आव्हानात्मक होती; पण चांगला अनुभव घेता आला.

इशरानी बरुआ, बॅडमिंटनपटू, भारत
Exit mobile version