। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
देशाचे आगामी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळीत विराजमान होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व्ही रमण्णा यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली आहे. न्यायमूर्ती लळीत यांचे कुटुंब रायगड जिल्ह्यातील पेण, आपटा इथे स्थायिक आहेत. त्यामुळे रायगडकरांसाठीही अभिमानाचा क्षण आहे.
न्यायमूर्ती उदय लळीत यांचा जन्म मुंबईतील आंग्रेवाडी इथे झाला. त्यांनी शिरोडकर हायस्कूलमधून मराठी माध्यमातून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. पुढे वकिलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रथम मुंबईतील ज्येष्ठ वकील एम. ए. राणे यांच्याकडे काही वर्षे सहायक म्हणून काम केले. नंतर ते दिल्लीत गेले आणि सहा वर्षे त्यांनी ज्येष्ठ विधिज्ञ सोली सोराबजी यांचे सहकारी म्हणून काम केले. अनेक वर्षे ते सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली करत होते.
2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ज्येष्ठ वकील म्हणून नामनिर्देशित केले. त्यांनी देशभर असंख्य महत्त्वाच्या खटल्यांमध्ये आपल्या वकिली कौशल्याचा ठसा उमटविला होता. एकूण 14 राज्यांच्यावतीने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात कसे लढवल्या आहेत. स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या विशेष अधिकारांतर्गत न्या. उदय उमेश लळीत यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली होती.
न्या.लळीत यांचे आजोबा अॅड. धोंडोदेव लळीत हे वकील होते. तर त्यांचे वडील अॅड. उमेश लळीत हे मुंबई उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील होते. 1974 ते 1976 या काळात त्यांच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले आहे. येत्या 27 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश म्हणून सूत्रे स्वीकारणार आहेत.
न्या.लळीत यांचे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील गिर्ये हे त्यांचे मूळ गाव आहे. मात्र सध्या लळीत कुटुंब रायगड जिल्ह्यातील आपटा इथे स्थायिक झाले आहे. मराठीत शिकलेल्या न्या.लळीत यांची अभिमानास्पद कारकीर्द म्हणावी लागेल.
न्या.रमणा यांच्याकडून शिफारस
देशाचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून न्या.उदय लळीत यांच्या नावाची शिफारस विद्यमान सरन्यायमूर्ती एम.व्ही.रमणा यांनी गुरुवारी केली. त्यांनी स्वतः गुरुवारी (4 ऑगस्ट) केंद्र सरकारला दिलेल्या 3 ऑगस्टच्या शिफारस पत्राची प्रत लळीत यांच्याकडे सोपवली. रमणा 26 ऑगस्टला सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर लळीत सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील.ते 8 नोव्हेंबर 2022 पर्यंत सरन्यायाधीश पदावर असतील. तेही 8 नोव्हेंबरला निवृत्त होण्याआधी अशाचप्रकारे पुढील सरन्यायाधीशाच्या नावाची शिफारस करतील.