सुधीर नाझरेंच्या छायाचित्रांचे उद्धव ठाकरेंकडून कौतुक

| मुरुड-जंजिरा | वार्ताहर |

मुंबई फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडियाचे 21 वे आंतराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन नवी मुंबई येथील भारतीय विद्या भवनात भरविण्यात आले आहे. त्या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेही उद्धव ठाकरे यांनी सुधीर नाझरे यांच्या छायाचित्रांचे कौतुक करीत शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर दिली.



यावेळी माजी मंत्री सुभाष देसाई, आ. अन रामचंद्र, सिने दिग्दर्शक संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत जगभरातून 40 देशांनी सहभाग घेतला असून, दोन हजारांपेक्षा जास्त छायाचित्र परीक्षणासाठी आली. त्यातील रायगडचे वृत्तपत्र छायाचित्रकार सुधीर नाझरे यांना मुंबईच्या गणेश विसर्जन फोटोला ट्रॅव्हल विभागात पीएसआय सुवर्णपदक व इतर दोन पदके मिळाली. सवुर्णपदके मिळालेली छायाचित्र पाहताना उद्धव ठाकरे यांनी छयाचित्रकार सुधीर नाझरे यांचे कौतुक केले. चित्रातील बारकावे जवळून पाहून छायाचित्राबाबत विचारणा केली. यावेळी पीएसआयचे अध्यक्ष अनंत निरगुडे, सचिव राजेंद्र वाघमारे, सलून चेअरमन सुनील व्यास, शशांक नरसाळे, संतोष निंबाळकर आदी नामांकित छायाचित्रकार उपस्थित होते.


यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्यासारख्या कलाकारांच्या सहवासात माहेरची माणसे भेटल्याचा भास झाला. मी माझ्या वडिलांकडून कलेचा वारसा घेतला. मी माजी मुख्यमंत्री होऊ शकतो, पण माजी छयाचित्रकार होणार नाही. कलाकाराची कला रक्तात असावी लागते. ती कोण चोरू शकत नाही. याप्रसंगी मुंबई फोटोग्राफी सोसायटी ऑफ इंडियातर्फे उद्धव ठाकरे यांना सन्मानपत्र व कायमस्वरूपी सभासदत्व बहाल करण्यात आले.

प्रदर्शनातील सुधीर नाझरे यांचे रायगडमधील पोयनाडजवळील कुर्डुस गावातील विहिरीवरील दहीहंडी या फोटोची उद्धवजी ठाकरे यांनी खास चौकशी केली. हा आगळावेगळा दहीहंडी महोत्सव फोटा प्रदर्शनात आकर्षणचा विषय ठरला.

Exit mobile version