उद्याचा मोर्चा होणारच!

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

‌‘जेन झी‌’ने सरकारची मस्ती जिरवली; ठाकरे बंधूंचा जोरदार हल्लाबोल

| मुंबई | प्रतिनिधी |

दिल्लीच्या जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांनी उभारलेल्या आंदोलनाने केंद्र सरकारला झुकवले असतानाच, विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्रातील लढाही अधिक तीव्र करण्याचा निर्धार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला. जेन झीने आपल्या सनदशीर आंदोलनाच्या जोरावर केंद्र सरकारचा मस्तवालपणा उतरवला असून, सरकारची मस्ती जिरवली आणि झिंज्या उपटल्या, असा घणाघाती हल्ला दोन्ही नेत्यांनी चढवला. तसेच, शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर हा उद्याचा मोर्चा ठरल्याप्रमाणे होणारच, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली.

मुंबईत मातोश्री निवासस्थानी शनिवारी संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजित दिपके यांचे अभिनंदन केले. भाजप सरकारने देशात असा भ्रम निर्माण केला होता की, देशात नागरिक उरलेलेच नाहीत, ती केवळ झुरळे आहेत. मात्र, याच एका ‌‘झुरळाने‌’ हुकूमशाही सरकारला झुकवून दाखवले, असा टोला त्यांनी लगावला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विद्यार्थी आंदोलनाचे जोरदार समर्थन केले. जेन झीने सरकारच्या झिंज्या उपटल्या आहेत, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. युवाशक्ती एकत्र आली तर ती काय करू शकते, याची जंतर-मंतरवरील आंदोलन ही केवळ झलक असल्याचेही त्यांनी म्हटले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला का गेले, याबाबतही राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला. ते दिल्लीला का गेले, हे मला माहिती नाही; त्याचा खुलासा त्यांनी स्वतःच करावा, असा टोला त्यांनी लगावला.

विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसह केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात उद्याचा मोर्चा होणारच असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. दादरच्या शिवाजी पार्कपासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार असून, तरुणांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यामुळे दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईतील राजकीय वातावरणही तापण्याची चिन्हे आहेत.

Exit mobile version