उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

प्रसारमाध्यमांशी संवाद साधत काढले चिमटे

। मुंबई । प्रतिनिधी ।

लोकसभेत ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक सादर करण्यात आले. त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनात हजेरी लावली होती. त्यानंतर विधान भवन आवारातील शिवसेना कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, वन नेशन, वन इलेक्शन म्हणता, मग राष्ट्रपतींची निवड निवडणूक प्रक्रियेतून होते तशी निवडणूक आयुक्तांचीही केली पाहिजे. तसेच, निवडणूक आयुक्तांची सरकारकडून नियुक्ती होण्याऐवजी ते सुद्धा निवडणूक प्रक्रियेतून जायला हवेत, असे ते म्हणाले. लोकशाहीत मतदाराला त्याचे मत शेवटपर्यंत कुठे जातेय हे कळलेच पाहिजे आणि त्यासाठी मतदान प्रक्रिया पारदर्शक असावी. ती पारदर्शक झाल्याशिवाय वन नेशन, वन इलेक्शन व्हायला नको, असे स्पष्ट मत ही त्यांनी यावेळी मांडले आहे. याचबरोबर राज्यपाल, मंत्रीमंडळ आणि लाडकी बहीण योजना या विविध मुद्यांवर देखील उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे.

गंमत म्हणून अधिवेशनाचे आयोजन
राज्यपालांच्या भाषणात पर्यावरणाबद्दल पुसटसा उल्लेख आहे. त्यात ते एक समिती नेमणार आहेत. त्या समितीमध्ये नेमके कोण असेल, किती तज्ञ असतील, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. आरे कारशेडसाठी झाडे कापली, आता दुसर्‍या कारशेडसाठी 1400 झाडांची कत्तल केली जाणार आहे. त्या कत्तलीला ही समिती परवानगी देणार का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत हे सरकार काही करणार आहे का, असा प्रश्‍न उपस्थित करतानाच गंमत म्हणून सरकार हे अधिवेशन घेत आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
मंत्रिमंडळ म्हणजे फिरता चषक
महायुती सरकारमधील मंत्र्यांचे मंत्रीपद अडीच वर्षांसाठीच असणार आहे. त्यानंतर दुसर्‍या आमदारांना मंत्रीपद दिले जाणार आहे. यावरूनही उद्धव ठाकरे यांनी सरकारला सुनावले आहे. क्रिकेटमध्ये फिरता चषक असतो हे माहीत आहे, पण मंत्रिमंडळातला फिरता चषक पहिल्यांदाच पाहत आहे, असा चिमटाही त्यांनी काढला आहे. मंत्री बदलणार तसे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही अडीच वर्षांनी बदलणार का, असा बोचरा सवालही त्यांनी केला आहे.
लाडक्या बहिणींना निकषात तोलणार?
शिंदे सरकारची लाडकी बहीण ही योजना होती. आता नवे सरकार आल्यानंतर लाडके आमदार आणि नाराज आमदार यांची चर्चा सुरू झाली आहे, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. ते पुढे म्हणाले की, निवडणुकीसाठी या योजनेला स्थगिती देण्यात आली होती. आता निवडणूक झाली, आचारसंहिता संपली. त्यामुळे सरकारने तात्काळ ही योजना सुरू करावी आणि लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये आश्‍वासन दिल्याप्रमाणे 2100 रुपये जमा करावेत. तसेच, लाडकी बहीण योजनेवरचे निकष बाजूला ठेवून आवडती-नावडती न करता लाडक्या बहिणींना पैसे देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
Exit mobile version