उद्धव ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका

शिवसेनेचे नासके आंबे भाजपच्या अढीत

| खोपोली | प्रतिनिधी |

आम्हाला त्यांची कूटनीती माहिती होती, पण ते नासके आंबे फेकून दिले आणि आज ते नासके आंबे भाजप नासवत आहेत. विकलेली, सडलेली, नासलेल्या मनाची माणसे असून, त्यांच्या मनामध्ये निष्ठा राहिलेली नाही, अशा गद्दारांना यापुढे थारा नाही, असा हल्लाबोल राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. आपल्या देशात भारत सरकार आहे, मोदी सरकार नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. ते अब की बार असा नारा देत असतील, तर आमची इंडिया आघाडी अब की बार.. मोदी तडीपार असा नारा देऊ लागली आहे, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी खोपोली येथे दिला.

खोपोली येथे शिवसेना जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या जनसंवाद सभेमध्ये बोलताना उध्दव ठाकरे यांनी अजून निवडणूक झालेली नाही आणि ही निवडणुकीची सभा नाही. ही माझी कुटुंबाची सभा आहे असे सांगून आपल्या परिवारात सामील होत आहेत. जयंतराव आणि आमच्या कुटुंबाचे नाते प्रबोधनकार यांच्यापासून बाळासाहेब यांच्यापासून असून, आज आमच्या इंडिया आघाडीमध्ये विशेष म्हणजे उल्काताई महाजन या कोणत्याही राजकीय पक्षाच्या वाऱ्यालाही नसणाऱ्या उल्काताई आंदोलनं करताना, त्यावेळी सर्वांना वाऱ्यासह उडवून टाकतात. त्यांनी आपल्या इंडिया आघाडीमध्ये संविधान वाचण्यासाठी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा आहे, असे सांगून देशातील शेतकरी, आदिवासी चळवळीची मदत इंडिया आघाडीसाठी महत्त्वाची आहे. आता भाजप देशात नंबर वन असे सांगत आहे, पण 30 वर्षांपूर्वी त्यांना महाराष्ट्र राज्यात कोणी विचारत नव्हते. त्यांना आम्ही 25 वर्षे अंगाखांद्यावर खेळविले आहे, असे सांगून भाजपवाले आणि भाडोत्री लोकांना उद्धव ठाकरे यांना शिव्या दिल्याशिवाय झोप लागत नाही. त्यांना माहिती आहे, हा उध्दव ठाकरे नाही, तर हा उध्दव बाळासाहेब ठाकरे आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात बाळासाहेब कोरलेले आहेत आणि त्यामुळे तिकडे जळगावातदेखील अमित शहा यांना उध्दव ठाकरे हे टार्गेट असेल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी 400 पारचा नारा दिला असला, तर निवडणूक जाहीर झालेली नसताना भाजपने 195 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात महाराष्ट्रात भाजप रुजवणारे नितीन गडकरी यांचे नाव नाही. हा योगायोग नाही तर, तर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बनविला म्हणून त्यांची आठवण यानिमित्ताने खोपोली येथे आठवण झाली. त्या ठिकाणी महाराष्ट्र लुटणाऱ्या कृपाशंकर सिंग यांचे नाव आले म्हणजे भाजप कुठे चालले आहे हे दिसते. कर्जत आणि मावळ या ठिकाणी या ठिकाणचा गद्दार घेतला, पण आम्ही या ठिकाणची जमीन नांगरून त्या ठिकाणी पुन्हा जोमाने पीक येईल याची खात्री यावेळी उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केली.

आम्हाला त्यांची कूटनीती माहिती होती, पण ते नासके आंबे फेकून दिले आणि आज ते नासके आंबे भाजप नासावत आहेत. भाजपचे हिंदुत्व हे दिखाऊपणा असून मोदी यांच्याकडून जे सुरू आहे, ते देशासाठी घातक आहे. दहा वर्षे पंतप्रधान होता आणि त्या दहा वर्षात काही केले नाही, पण आता पुढील दहा शेती करून पिकवणार आहे. हिंदू जनआक्रोश मोर्चा हे तुमचे अपयश आहे, असे सांगून कामगार चळवळ मोडीत काढली असून, हा भाग कामगारांचा परिसर आहे असे सांगून या पट्ट्यात नवीन उद्योग एकही आला नाही आणि होते ते बुडून गेले आहेत, याचा विचार सर्वांनी करायला हवे, याचे विचारमंथन करायला हवे, असे आवाहन केले. ही लढाई मी लढत आहे, ही लढाई मी उध्दव ठाकरे यांच्यासाठी लढत नाही, तुमच्या मुलाबालांसाठी लढावे लागत आहे. पुढील निवडणूक ही पहिली निवडणूक नाही असे सांगत पुन्हा भाजप आले तर ही शेवटची निवडणूक आहे असे सांगून हुकूमशाही येऊ नये यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असून, मी भाजपला नोटीस दिली असून,

अब की पार भाजप तडीपार…असा नारा यावेळी दिला. खोपोली येथील राष्ट्रीय महामार्गावर बाजूला असलेल्या मैदानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.शिवसेना जनसंवाद सभेच्या निमित्ताने आयोजित सभेला माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते,खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, शिवसेना उप नेते सचिन आहीर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, माजी आमदार आणि पुणे जिल्हा प्रमुख ॲड. गौतम चाबुकस्वार, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबन पाटील, मावळ लोकसभा मतदारसंघाचे संघटक संयोग वाघेरे पाटील, दक्षिण रायगड जिल्हा संपर्क प्रमुख किशोर जैन, जिल्हा प्रमुख मनोहर भोईर, सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, सहसंपर्क प्रमुख भाई शिंदे, महिला आघाडी उपजिल्हा संघटक अनिता पाटील, खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, उत्तम कोळंबे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्काताई महाजन यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.

कोकणचं चित्र बदलून टाकू
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतील मावळा शिवसेनेने रिंगणात उतरविला आहे, त्याबद्दल धन्यवाद. ज्या-ज्या वेळी शेकाप आणि शिवसेना एकत्र आली आहे, त्या-त्या वेळी आमचाच विजय झाला आहे. खोपोलीत सुरु असलेलं गचाळ राजकारण संपविण्याचं काम इंडिया आघाडीचे कार्यकर्ते नक्की करतील, ही आशा आहे. देशाचं संविधान बदलण्याचं काम सुरु आहे. आज या निवडणुकीचं चित्र वेगळं आहे. तळागाळात पोहोचण्याचं काम इंडिया आघाडीचे कार्यकर्ते करीत आहेत. इंडिया आघाडीत काम करताना जो मान-सन्मान मिळतो, त्याचा अभिमान आहे. आज उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील एकत्र आले आहेत. त्यामुळे संपूर्ण कोकणाचं चित्र बदलून टाकू, असे आश्वासनही आ. जयंत पाटील यांनी दिले. महाराष्ट्राची सूत्रं पुन्हा तुमच्या हाती यावी, याची जनता आतुरतेने वाट पाहात आहे.
रायगड, मावळ आपणच जिंकणार
आगामी लोकसभा निवडणुकीत रायगडची जागा आपण जिंकूच, शिवाय मावळची जागासुद्धा आपण जिंकणार, असा विश्वास मी शिवसेना पक्षप्रमखुम उद्धव ठाकरे यांना दिला आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री तथा शिवसेना ज्येष्ठ नेत अनंत गीत यांनी केले. खोपोलीतील जनसंवाद मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, रायगड मतदारसंघाचे सहा आणि मावळचे विधानसभा मतदारसंघाचे तीन असे नऊच्या नऊ आमदार इंडिया आघाडीचे विजयी होतील, असा विश्वासदेखील अनंत गीते यांनी व्यक्त केला. मावळचे खासदार संजोग वाघेरे होतील, तर कर्जत-खालापूरचे आमदार नितीन सावंत झाल्याशिवाय राहणार नाही, असेही गीते यांनी स्पष्ट केले. दरम्यान, येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान करुन आपल्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे, त्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही अनंत गीते यांनी केले.
भाजप हटाव, संविधान बचाव
मी शिवसैनिक नाही, मी संविधान सैनिक आहे. आणि, संविधान सैनिक या नात्याने आज देशामध्ये जी भीषण आणि बिकट परिस्थिती ओढावली आहे, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी नागरिकांची जी आघाडी उभी आहे, त्या आघाडीची प्रतिनिधी म्हणून मी बोलत आहे, असे प्रतिपादन भारत जोडो अभियान चळवळीच्या राज्य समन्वयक उल्का महाजन यांनी केले. आमची लढाई संविधान वाचवण्यासाठी उभी आहे. त्यामुळे आपल्या सर्वांचे मत इथल्या उमेदवारासाठी तर असेलच, पण यावेळी ते मत संविधान वाचवण्यासाठी आणि संविधानासाठी असेल, असेही त्या म्हणाल्या. आतापर्यंत देशातील दक्षिणेतील पाच राज्ये भाजपमुक्त झाली आहेत, त्यावरती आता महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राचे स्थान अत्यंत कळीचे असून, आणि भाजपविरोधी लढणाऱ्या सर्वांना महाराष्ट्राकडून आशा आहेत. त्यामुळे भाजपाविरेधी जी इंडिया आघाडी उभी आहे, तिला आम्ही नागरिकांची चळवळ समर्थन देत असल्याचे उल्का महाजन यांनी स्पष्ट केले. तसेच इंडिया आघाडीकडून घोषित होणाऱ्या कोणत्याही अधिकृत उमेदवाराला भारत जोडो यात्रेकडून पूर्ण पाठिंबा आहे, असा विश्वास महाजन यांनी दिला. त्या म्हणाल्या की, नागरिक झटून कामाला लागले आहेत, आणि जशी भारत जोडो अभियान ही आघाडी आहे, तशा महाराष्ट्रात अशा आठ आघाड्या त्या आठही आघाड्या एकत्र आणि त्यांनी एक आवाहन देणारी घोषणा संपूर्ण महाराष्ट्राला केले आहे, ती म्हणजे निर्धार महाराष्ट्राचा. आणि महाराष्ट्राचा निर्धार आहे, भाजप हटाव, संविधान बचाव. भारतीय जनता पार्टीने देशभर सगळी मोडतोड चालवली असल्याचा आरोपही उल्का महाजन यांनी केला.
Exit mobile version