मोदींची तुलना केली औरंगजेबाशी
। मुंबई । प्रतिनिधी ।
देशासह राज्यात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या स्फोटक मुलाखतीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. यामध्ये ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत महाराष्ट्रातील उद्योग-धंदे, बेकारी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेमधील फुट यावर जोरदार भाष्य केले आहे. तसेच, शरद पवार आणि मी म्हणजे संताजी धनाजी यांच्यासारखे असल्याचे म्हणत ठाकरे यांनी मोदींची औरंगजेबाशी तुलना केली आहे.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, असं म्हणतात की, मोगलांच्या घोड्यांना पाण्यातही संताजी-धनाजी दिसायचे, तसे आम्ही दोघे त्यांच्या खेचरांना दिसत असू. तसेच, ठाकरेंनी नवाझ शरीफ, पाकिस्तान आणि केकचा मुद्दा काढत मोदींची औरंजेबाशी तुलना केली. ठाकरे म्हणाले, न बोलावताही पाकिस्तानात जाऊन नवाझ शरीफांच्या वाढदिवसाचा केक खाणारे लोक मला औरंगजेब फॅन म्हणू शकत नाहीत. कारण औरंगजेबदेखील गुजरातमध्ये जन्मला होता. जसे हे दिल्लीला गेलेत तसेच औरंगजेब आग्य्राला जाऊन बसला होता. महाराष्ट्र जिंगण्यासाठी औरंगजेब 27 वर्षे इथे बसला होता. पण तो पुन्हा कधीच आग्य्राला जाऊ शकला नव्हता हे त्यांनी लक्षात ठेवावे.
दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदा शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी झाली. अनेक मोठे-मोठे नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सोडून गेले आहेत. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी आक्रमक पावित्रा घेत महाराष्ट्रभर दौरे करत प्रचाराची राळ उठवली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपबरोबर गेल्याने सध्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर सत्ताधारी टीका करत आहेत. हे दोन्ही नेते अनेकवेळा महाराष्ट्रातील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींचे टार्गेट ठरले आहेत.
ते गल्ली-बोळातही रोड शो करतील उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला चांगलेच झोडपले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचारसभांचा सपाटा लावला आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी आज राज्यभर फिरत आहेत. मला वाटतं ते आता गल्ली-बोळातही एखादा रोड शो करतील. त्यांनी तो करावा. महाराष्ट्र कसा आहे पाहावा. महाराष्ट्राचा संताप आणि आक्रोश त्यांनी अनुभवावा. महाराष्ट्राचे प्रेम आणि आशीर्वाद मोदींना दहा वर्षे मिळाला. आता मोदीजींनी महाराष्ट्राचा शाप काय असतो हे अनुभवावे.
देशासह महाराष्ट्रातील सर्वकाही गुजरातला ठाकरे म्हणाले, ज्यावेळी मुख्यमंत्री होतो तोपर्यंत कोणताही उद्योगधंदा गुजरातला नेण्याची त्यांची बिशाद नव्हती. पण नंतरी गद्दारीमुळे त्यांचे सरकार डबल इंजिन झाले आणि त्यानंतर डबल इंजिनामुळे त्यांनी वेगाने उद्योग-धंदे पळवले. याच मुद्द्यावर पुढे बोलताना ते म्हणाले, हे जे उद्योग-धंद्यांबाबत घडले आहे, तसेच बाढलेल्या बेरोजगारी आणि बेकारीमुळे जनतेमध्ये राग आहे.