। महाड । प्रतिनिधी ।
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शनिवारी (दि.6) रत्नागिरी,महाडच्या दौर्यावर येत आहेत. या दौर्याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. राजापूर तालुक्यातील बारसू येथे होऊ घातलेल्या रिफायनरीवरुन सध्या राजकारण चांगलंच तापलंय. बारसूवासियांसह ठाकरे गटानेही बारसू रिफायनरीला विरोध दर्शवला आहे. रिफायनरी प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना भेटण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 6 मे ला बारसूचा दौरा करणार आहेत. मात्र आता या सभेची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. ठाकरे गटाने रानतळे येथे सभेचे नियोजन केले होते.
उद्धव ठाकरे आंदोलकांची भेट घेणार आहे. ठाकरे यांना बारसू गावातील रिफायनरी विरोधकांना भेटण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. मात्र कुठल्याही प्रकारची सभा घेण्याची परवानगी नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रिफायनरी समर्थक देखील ठाकरे यांची भेट घेणार असून संमतीपत्रे सादर करणार आहेत. रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू येथे माती परीक्षणाचे काम हाती घेण्यात आली असून या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलकांनाही ते भेटणार आहेत.
महाडमध्ये पक्षप्रवेश
महाड येथे सायंकाळी ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप या आपल्या परिवारासह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेश सोहळ्याची जोरदार तयारी सध्या महाडमध्ये सुरु आहे.