प्रवासी संघटनेचा रेल्वे प्रशासनाला प्रश्न
। नेरळ । प्रतिनिधी ।
मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील कर्जत एन्डकडील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक विकासकामे सुरु आहेत. त्यात कर्जत दिशेकडे उद्वाहन उभारण्याचे काम सुरु आहे. मात्र, या स्थानकातील सरकत्या जिन्याचे काम अद्याप सुरूच झाले नाही, अशी तक्रार भिवपुरी रोड प्रवासी संघटनेने केली आहे.
मेन लाईनवरील कर्जत दिशेला असलेल्या भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी उदवाहन उभारण्याचे काम सुरु आहे. गेली अनेक महिने त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम सुरु नव्हते. त्यामुळे कर्जत येथील माहिती अधिकार कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी पुढाकार घेतल्याने आता भिवपुरी रेल्वे स्थानकात रखडलेल्या उद्वाहन उभारणी कामाला गती मिळाली आहे. तर, आता पुढील महिन्यात उद्वाहन यंत्रणा कार्यान्वित होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासन यांच्याकडून देण्यात आले आहे. त्यामुळे भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटनेने समाधान व्यक्त केले आहे. मात्र, त्याचवेळी भिवपुरी रोड स्थानकात फलाट दोनच्या बाहेर डिकसळ गावाच्या बाजूला सरकता जिना उभारण्यात येणार आहे. या सरकत्या जिन्याचे कोणतेही काम अद्याप सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे भिवपुरी रोड स्थानकातील सरकत्या जिन्याचे काम कधी सुरु होणार, असा प्रश्न भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष किशोर गायकवाड, पदाधिकारी महेश कडव, राजेश विरले यांनी उपस्थित केला आहे.