उज्वल भारत-उज्वल भविष्य महावितरणतर्फे महोत्सव

| पालघर | प्रतिनिधी |
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य- पॉवर 2047 हा कार्यक्रम भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालय तसेच नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि महाराष्ट्रातील महावितरण, महानिर्मिती, महापारेषण व इतर भागीदार यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य शासनाच्या सहकार्याने 25 ते 30 जुलै या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे.

पालघर येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात 27 जुलै रोजी दुपारी 3 वाजता तर 29 जुलै रोजी जव्हार येथे प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपील पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धराम सालीमठ, महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे, महावितरणच्या कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांची या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे. तर जिह्यातील सर्व विधानसभा व विधानपरिषद सदस्य कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येणार आहेत.

केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, एकात्मिक उर्जा विकास कार्यक्रम, सौभाग्य योजना, कुसूम योजना, राज्य शासनाच्या कृषिपंप वीज जोडणी धोरण-2020, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजना, विलासराव देशमुख अभय योजना, मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना, कृषिपंपांना उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे जोडणी, इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग सुविधा आदी योजनांमधून वैयक्तिक अथवा सार्वजनिक सुविधांचा लाभ मिळालेले लाभार्थी या कार्यक्रमात उपस्थित राहून आपले अनुभव कथन करणार आहेत. या योजनांच्या यशस्वितेबाबत ध्वनिचित्रफितीद्वारे माहिती सादर करण्यात येणार आहे. याशिवाय नुक्कड, नाटक आदी भरघोस कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पालघर मंडलच्या अधीक्षक अभियंता किरण नागावकर, वसई मंडलाचे अधीक्षक अभियंता राजेशसिंग चव्हाण, नोडल अधिकारी ध्रुव आपटे यांनी केले आहे.

Exit mobile version