उल्हास ‘लब्धी’चे सांडपाणी ग्रामस्थांकडून संताप व्यक्त

| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील नेरळ दहिवली येथील उल्हास नदीच्या काठावर उभारण्यात येणार्‍या लब्धी गार्डनचे सांडपाणी थेट नदी पत्रात सोडण्यात येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केल्या होत्या. त्यावर निर्वाचित सरपंच मेघा अमर मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी थेट नदी पत्रात जाऊन पाहणी केली. त्यानंतर सांडपाणी थेट नदी पत्रात सोडण्यात येत असल्याचे दिसून आले. सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येणार असल्याने सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

उल्हास नदी बचाव ग्रुप च्या माध्यमातून दहीवली येथील उल्हास नदिलगत सुरू असलेल्या लब्धी गार्डन्स या गृह प्रकल्पातून जो सांडपाण्याचा निचरा होत आहे तो थेट नदी पात्रात असून याबाबत अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत आणि त्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल दिलेला आहे. 26 जानेवारी रोजी बाबत ग्रामपंचायत मध्ये ग्राम सभेत मुद्दा उपस्थित केल्यानंतर उपस्थित सर्व नागरिक, सदस्य, सरपंच यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता आजही नदी पात्रात सांडपाणी जात असल्याचे निदर्शनास आले. याप्रसंगी मेघा अमर मिसाळ, उपसरपंच आदेश एकनाथ धुळे, पंचायत समिती सदस्य अमर मिसाळ, सदस्य नरेश कालेकर, सोनम बंधू गायकवाड, पिंटू भवारे यांच्यासह भास्कर तरे, जनार्दन तरे, ड.पंकज तरे, सतीश कालेकर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उल्हास नदीपत्रात सोडलेल्या सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येणार आल्याने हे पाणी थांबले नाही तर आंदोलन करण्याचा इशारादेखील ग्रामस्थांनी दिला आहे.

प्रत्यक्ष पाहणी केली असता एकंदर लब्धी गार्डन्स या गृहप्रकल्प व्यावसायिक येथील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असून, हा प्रकार अतिशय गंभीर आहे. याबाबत ग्राम पंचायत जाब विचारणार असून, पाण्याचा निचरा त्वरित थांबला पाहिजे अन्यथा बिल्डरवर कठोर कारवाई केली जाईल. – मेघा मिसाळ, सरपंच, दहिवली

नियमानुसार सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पातील पाणी बाहेर कुठेही जाता कामा नये परंतु आजही नदी पात्रात पाणी सर्रास सोडले जात आहे. त्यामुळे याबाबत त्वरित तहसील, जिल्हाधिकारी आणि प्रदूषण मंडळास याबाबत लेखी तक्रार करून याबाबत ऑडिट करण्याची मागणी करणार आहोत. हा प्रकार त्वरित थांबला नाही तर मोठे आंदोलन छेडले जाईल. – तरे, उल्हास नदी बचाव ग्रुप प्रमुख

Exit mobile version