अंकुर स्पोर्टस्, श्रीराम संघ, विजय स्पोर्टस् (ठाणे), ओम् पिंपळेश्वर विजयी
। मुंबई । प्रतिनिधी ।
अंकुर स्पोर्टस्, श्रीराम संघ, विजय स्पोर्टस् (ठाणे), ओम् पिंपळेश्वर यांच्या साखळीतील पहिल्या विजयाने अमरहिंद मंडळाच्या राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेला प्रारंभ झाला.
गोखले रोड दादर (प) येथील मंडळाच्या पटांगणातील मॅटवर “स्व. उमेश शेणॉय स्मृती चषक राज्यस्तरीय“ स्पर्धेच्या क गटातील पहिल्या साखळी सामन्यात मुंबई शहराच्या अंकुर स्पोर्टस्ने उपनगराच्या जॉली स्पोर्टस्ने आव्हान 47-38 असे परतवून लावले. सुरुवात आक्रमक करीत जॉलीने पहिला लोण देत 2 गुणांची आघाडी घेतली. त्याला प्रतिउत्तर देत अंकुरने देखील लोण देत तोडीस तोड उत्तर देत विश्रांतीपर्यन्त 24-21 अशी आगेकूच केली. विश्रांतीनंतर आणखी एक लोण देत विजयावर शिक्कामोर्तब केले.
पालघरच्या श्रीराम संघाने ई गटात मुंबईच्या गोलफादेवीचा प्रतिकार 43-35 असा मोडून काढला. पूर्वार्धात अत्यंत चुरशीने खेळलेल्या या सामन्यात 16-15 अशी श्रीरामकडे आघाडी होती. उत्तरार्धात मात्र जोरदार मुसंडी मारत श्रीरामाने गोलफादेवी वर दोन लोण देत विजय प्राप्त केला. मुंबईच्या ओम् पिंपळेश्वरने ब गटात पुण्याच्या बलाढ्य बाबुराव चांदेरेला 45-43 असे रोखत उपस्थितांना आश्चर्य चकित केले. पहिल्या डावात 19-11 अशी आघाडी घेणार्या चांदेरे फाऊंडेशनला दुसर्या डावातील अतिसंयम नडला. शेवटच्या क्षणापर्यंत 3 गुणांची आघाडी चांदेरे संघाकडे होती. शेवटच्या चढाईत एक गुण दिला असता तरी चांदेरे संघ जिंकला असता.
ठाण्याच्या विजय स्पोर्टस्ने अ गटात मुंबईच्या जय दत्तगुरुचा 46-28 असा पराभव केला. मध्यांतराला 18-14 अशी आघाडी घेणार्या विजयने नंतर मात्र आपला खेळ गतिमान करीत 18 गुणांच्या फरकाने सामना आपल्या बाजूने झुकविला. पण पूर्वार्धात त्यांचा सुर हरपला. अन्य निकाल लायन्स स्पोर्टस् वि. वि. श्री. विठ्ठल (57-31), ओवळी क्रीडा मंडळ वि. वि. जय भारत (32-29).
या स्पर्धेचे उद्घाटन मंडळाचे माजी कबड्डी संघनायक रंजन पडते यांच्या हस्ते झाले. तदप्रसंगी श्रीमती शेणॉय, अरुण देशपांडे, मिनानाथ धानजी(शिवछत्रपती पुरस्कार), स्पर्धानिरीक्षक शरद कालंगण आदी मान्यवर उपस्थित होते.