रायगडमध्ये अघोषित भारनियमन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

उष्णतेच्या लाटेत रायगडमधील नागरिक होरपळून निघत आहेत. त्यातच सतत खंडित होणार्‍या वीजपुरवठ्यामुळे येथील नागरिक अधिकच हैराण झालेत. वीज खंडित होण्याचे प्रमाण ग्रामीण विभागात सर्वाधिक आहे. कधीकधी दिवसभर गेलेली वीज रात्री तीन-चार तासांसाठी येते. मान्सूनपूर्व दुरुस्ती, झाडांच्या छाटणीच्या कामामुळे वीजपुरवठा खंडित करत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे.

मान्सूनचे आगमन होण्यास अद्याप दोन महिने बाकी असताना महावितरण कंपनीने कधीच इतकी तत्परता दाखवलेली नव्हती. त्यामुळे शहरी भागातील वाढती मागणी पुरवण्यासाठी ग्रामीण भागात अघोषित भारनियमन सुरू केले की काय, अशी शंका येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.

जिल्ह्यात काही दिवसांपासून 35 ते 38 अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद होत आहे. उकाडा कमालीचा वाढला आहे. दिवसभर अंगाची लाहीलाही होत आहे. शहरी भागातील नागरिकांकडून यासाठी एसी, पंखे, कुलर, फ्रीजचा वापर वाढला आहे. त्यामुळे विजेची मागणीही साधारण 15 टक्क्यांनी वाढली आहे; मात्र ही मागणी पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचे येथील लोकांचे म्हणणे आहे.

जिल्ह्याच्या कोणत्या ना कोणत्या भागात दररोज किमान एक ते दोन तास वीजपुरवठा खंडित होत आहे. अतिरिक्त भार वाढत असल्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याचा दावा महावितरण करीत आहे; तर वाढलेल्या उष्णतेमुळे विद्युत रोहित्रांमधील तेल कमी होणे, काही यंत्रे नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत असल्याने दुरुस्तीची कामे वाढली असल्याचे कंपनीच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

गेल्या काही दिवसांपासून सकाळ, दुपार, सायंकाळ असे वेळी-अवेळी वीजपुरवठा खंडित होत आहे. रोहा, खालापूर, सुधागड, पोलादपूर परिसरात कायमच वीज गायब होत असल्याच्या तक्रारी आहेत. तालुक्यांच्या गावात दुपारच्या वेळी अर्धा ते पाऊण तास वीजपुरवठा खंडित होत आहे. सकाळच्या वेळेत नागरिकांची कामावर जाण्याची गडबड आणि त्यात वीज गेल्याने कामे खोळंबून पडत आहे. दुपारी पुरवठा खंडित होत असल्याने उकाड्यात वाढ होत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक हैराण होत आहेत. दिवसातून अर्धा ते पाऊण तास वीजपुरवठा खंडित होत आहे. ऐन उन्हाळ्यात दुपारच्या वेळेत विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

उष्णतेच्या लाटेत विजेचा वापर नक्कीच वाढला आहे. जिल्ह्यातील काही ठराविक भागातच हे दिसून येत आहे. तेथील पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कदाचित कमी वापर असलेल्या ठिकाणचा वीजपुरवठा बंद केलेला असेल. त्याचबरोबर वाढलेल्या तापमाणात यंत्रसामुग्रीही नादुरुस्ती होत असते. एप्रिलपासून दर मंगळवारी मान्सूनपूर्व कामांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलेले आहे. यात झाडांची छाटणी, विद्युत वाहिनींची दुरुस्ती केली जात आहे.

ए. यू. मुलाणी, मुख्य कार्यकारी अभियंता, महावितरण, पेण
Exit mobile version