| श्रीवर्धन | वार्ताहर |
काल बुद्ध पौर्णिमा असल्यामुळे सार्वजनिक सुट्टी होती. त्यामुळे श्रीवर्धन मध्ये पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात आले होते. मात्र संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत होण्यास रात्रीचे सव्वा दोन वाजले. वीज पुरवठा भरपूर वेळ खंडित झाल्यामुळे इन्व्हर्टर बॅकअप देखील अनेक ठिकाणचा संपला होता. त्यामुळे हॉटेल व्यवसायिक, पर्यटक व नागरिक सर्वांचेच हाल झाले.
श्रीवर्धन येथील वीज उपकेंद्रामध्ये पाभरे विद्युत केेंद्र येथून वीज पुरवठा केला जातो. पाभरे ते श्रीवर्धन वीज उपकेंद्र या येणार्या विद्युत वाहिनीमध्ये म्हसळा तालुक्यातील खारगाव गावाच्या परिसरामध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याचे महावितरणच्या अभियंत्यांकडून सांगण्यात आले. ज्या ठिकाणी हा बिघाड झाला होता. त्या ठिकाणी भरतीचे पाणी येत असल्याने, काल पौर्णिमा असल्याने उधाण भरपूर होते. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. मात्र एवढा वेळ वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पर्यटकांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली.
श्रीवर्धन मधील चार ते पाच मोठी हॉटेल्स वगळता अन्य ठिकाणी जनरेटरची सुविधा उपलब्ध नाही. त्या ठिकाणी इन्व्हर्टर बॅकअपच आहे. श्रीवर्धन मधील पर्यटन व्यवसाय वाढलेला असताना महावितरणने आता इनकमिंग वीज वाहिन्यांमध्ये बिघाड झाल्यानंतर श्रीवर्धन येथील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. यापूर्वी त्या प्रकारची व्यवस्था करण्याचा प्रयत्न झाला होता. गोंडघर येथील वीज उपकेंद्रातून दांडगुरी मार्गे येणार्या विद्युत वाहिनीतून श्रीवर्धन वीज उपकेंद्रांमध्ये वीजपुरवठा घेता येत होता. मात्र सदर विद्युत वाहिन्यांची गेल्या अनेक दिवसांपासून दुरुस्ती झालेली नसल्यामुळे पर्यायी व्यवस्थाच बंद पडल्याचे चित्र आहे. तरी महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्यांनी श्रीवर्धन येथील वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर, श्रीवर्धन साठी पर्यायी वीजपुरवठा सुरू करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या. अशी मागणी श्रीवर्धन येथील पर्यटक व्यावसायिकांकडून व नागरिकांकडून केली जात आहे..