। पनवेल ग्रामीण । वार्ताहर ।
मुंब्रा-पनवेल महामार्गावर कळंबोली येथील उड्डाणपुलाखाली सध्या मोठ्या प्रमाणात प्रवासी बस उभ्या केल्या जात आहेत. या बसमुळे वाहतूकीला अडथळा होत असतानादेखील कळंबोली वाहतूक विभागाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
मुंब्रा-पनवेल महामार्गांवर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. दररोज होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कळंबोली येथे उड्डाणपुल बांधण्यात आले आहेत. मात्र, त्या नंतर देखील कळंबोली सर्कल ते कळंबोली येथे बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलावरदेखील वाहतूक कोंडी होत असते. पुलावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक वाहन चालक पुलावरून जाण्याऐवजी पुला खालून असलेल्या सर्व्हिस रोडचा वापर करणे पसंत करतात. मात्र, या ठिकाणी पुला खाली तसेच सर्व्हिस रोडवर अनधिकृत पणे उभ्या करण्यात येणार्या अवजड वाहन आणि बस मुळे सर्व्हिस रोडवर देखील वाहतूक कोंडी होत असल्याने पुलाखाली उभ्या करण्यात येणार्या बसवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकानकांडून करण्यात येत आहे. या बाबत कळंबोली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिभाऊ बाणकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.