महसुल खात्याच्या दुर्लक्षाने
। पेण । संतोष पाटील ।
पेणकरांची जिवनवाहीनी समजली जाणारी भोगावती नदीच्या पात्रामध्ये गेल्या दोन-तीन वर्षात अनधिकृतरित्या भराव टाकून मोठया प्रमाणात बांधकाम सुरू आहे. या बांधकामाकडे ना महसूल खात्याचे लक्ष ना जलसंपदा खात्याचे लक्ष. ना नगरपालिका प्रशासनाचे. त्यामुळे भोगावतीचे पात्र दिवसेंदिवस अरुंद होत चाललेले आहे. व याचा फटका नदीच्या आजु बाजुच्या गृह वस्तीला होत आहे. गेल्या दोन-तीन वर्षात थोडा जरी पाऊस पडला तरी भुंडया पुलाच्या वरून पाणी जातो. यामुळे भोगावती नदी संवर्धन प्रेमी संतप्त झाले आहेत.
भोगावती नदीच्या भुंडया पुलापासून ते हेटवणा धरणाच्या पायथ्यापर्यंत नदीच्या पायथ्याचा विचार केल्यास नदी पात्रात अनधिकृतरित्या बांधकाम करणार्यांची संख्या शतकी पार झालेली आहे.. परंतु या बाबींकडे प्रशासन का दुर्लक्ष करतेय हे समजत नाही. भुंडया पुलाच्या शेजारी तरणखोप स्मशानभूमीपर्यंत भले मोठे भोगावती नदीचे पात्र होते. परंतु आज या भोगावती नदीच्या पात्रात मोठया प्रमाणात भर टाकून पात्राची रुंदी कमी करण्यात आलेली आहे. असेअसताना ही बाब महसू खात्याच्या तलाठयांना अथवा मंडळ अधिकार्यांना कशी दिसत नाही हीच मोठी संशोधनाची बाब आहे. तरणखोप स्मशानभूमी पासून एक नजरेचा कटाक्ष टाकल्यास सहज लक्षात येत आहे की, नदी पात्रात अनाधिकृत रित्या भराव करून नदी पात्र अरुंद करण्याचे काम इमान इतबाराने केलेले आहे. तसेच या नदी पात्रात नव्याने बांधकाम झालेले आपल्याला पहायला मिळत आहे.
मार्च-एप्रिल चा विचार करता काही भागात नव्याने भराव करण्यात आलेला असून रितसर नदीच्या बाजूने पिचिंग करून सिमेंटने बांधकाम केलेले आहे. एक वेळ अशी होती की, भुंडया पुलाकडून धावटयाकडे जाण्याचा जो मार्ग होता त्या रस्त्यापर्यंत नदीचे पात्र होते. परंतु आज कित्येक ठिकाणी भराव करून नदी पात्रच अरुंद केले गेले आहे. असच नदी पात्र अरुंद झाल्यास भविष्यात पुराचे पाणी नदीपात्र सोडून इत्रस्त आपला मार्ग निवडेल आणि मोठया प्रमाणात याचा धोका जनजीवन विस्कळीत होण्यास होईल. तसेच हेच अनधिकृत बांधकाम करणारे नुकसान झाला म्हणून प्रशासनाला दोषी धरतील तरी वेळेस प्रशासनाने या अनधिकृत बांधकाम करणार्यांवर कारवाईचा बडगा उचलावा अन्यथा भविष्यात पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्यास विचार करण्यापलिकडे काहीच हातात राहणार नाही. वेळेस खबरदारी म्हणून पंचनामे करून संबंधीतांवर कारवाई व्हावी अशी मागणी भोगावती संवर्धन प्रेमी करत आहेत. परंतु महसुल खात्याचे कर्मचारी याकडे कानाडोळा करत आहेत.
या बाबींकडे प्रांताधिकारी आणि तहसिलदार यांनीही लक्ष देणे गरजेचे आहे. गेल्या एप्रिल महिन्यापर्यंत ज्या भागामध्ये बांधकाम नव्हते त्या भागात आज बांधकाम झालेले पहायला मिळत आहे. हे बांधकाम नक्कीच एका रात्रीत झालेले नाही. मग बांधकामाला मदत करणारे कोण याचा शोध वरिष्ठ अधिकार्यांनी घेणे गरजेचे आहे. आणि याचा शोध घेऊन जर या महाभागांवर कारवाई झाली नाही तर भोगावती संवर्धन प्रेमी रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाहीत. या बाबींचा विचार देखील महसूल खात्याने करणे गरजेचे आहे.
संबंधितांवर कारवाई केली जाईलः तहसिलदार
भोगावती नदीमध्ये अनाधिकृत रित्या चाललेल्या बांधकाम संदर्भात पेण तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, संबंधित प्रकरणाची सविस्तर माहिती घेउन अनाधिकृत रित्या नदिमध्ये बांधकाम करणार्यांन विरुध्द कायदेशीर कारवाई केली जाईल.असे सुचित केले.
राजकीय मंडळीकडून प्रयत्न
भोगावती नदीमध्ये चाललेल्या अतिक्रमणासंदर्भात आमचा प्रतिनिधी छायाचित्रण करण्यासाठी गेला असता छायाचित्रण करण्यास मज्जाव केला. तसेच सदरील बातमी प्रसिध्द होउ नये म्हणून राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असून लक्ष्मी दर्शनाचा देखील आमीश दाखवण्याचा प्रयत्न आहे. सदरील या अतिक्रमणामध्ये पेण नगरीच्या मा.नगरसेवकाचा हात असल्याचे देखील बोलले जात आहे. परंतु नदी पात्रात होणार्या बांधकामाला भोगावती संवर्धन प्रेमींचा विरोध असल्याने सदरील वृत्त छापण्यास कृषीवल कुणाच्या दबावाला बळी पडणार नाही.