मुरुडमध्ये विनापरवानगी बांधकाम

दोन इमारत मालकांवर गुन्हा दाखल


| मुरुड जंजिरा | वार्ताहर|

मुरुड शहरातील दिंडी तळा या भागात सिटी सर्वे नंबर 1728 व जुनी पेठ परिसरात सिटी सर्वे नंबर 1075 मध्ये नगरपरिषदेची कोणतीही परवानगी न घेता तळमजला व दोन मजली इमारतीचे बांधकाम केल्याप्रकरणी दोघांवर मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुरुड नगरपरिषदेकडून मुरुड पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, इम्तियाज महंमद कडू यांनी दिंडी तळा या भागात मुरुड नगरपरिषदेची कोणतीही परवानगी न घेता तळमजला व दोन मजली इमारतीचे बांधकाम केले होते. त्यांना नगरपरिषदेकडून 3 ऑगस्ट 2023 रोजी नोटीससुद्धा बजावण्यात आली होती. या नोटिसीला न जुमानता त्यांनी इमारतीचे बांधकाम केले. याबाबत नगरपरिषद बीट अधिकाऱ्यांनी इमारतीचे सर्वेक्षण करून नगपरिषदेस आपला अहवाल सादर केला होता.

जुनी पेठ मोहल्लामधील अब्दुल रहीम अब्दुल हमीद कबले यांनीसुद्धा तळमजला व दुमजली (ग्राऊंड+2) इमारतीचे बांधकाम केले होते. त्यांनासुद्धा नगरपरिषदेने 17 मे 2023 रोजी नोटीस बजावली होती. सदरचे बांधकाम रस्त्यालगतसुद्धा आहे. नगरपरिषदेच्या नोटिशीला न जुमानल्यामुळे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी कारवाई केली आहे. याबाबतचा गुन्हा मुरुड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.

Exit mobile version