महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
सध्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये अनधिकृत बांधकामांना ऊत आला आहे. महसूल प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी नवीन अनधिकृत बांधकामे उभी केली जात आहेत. ही बांधकामे करणारे हे स्थानिक कमी असून बाहेरून आलेले धनदांडगेच असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये अनेक ठिकाणी वनविभागाचा शिक्का असलेल्या जागांवरदेखील बांधकाम करण्यात आलेले आहे. केंद्र शासनाच्या परवानगीशिवाय वनैतर कामास बंदी अशा प्रकारचे शिक्के असलेल्या जागांवरदेखील मोठमोठे बंगले उभे राहत आहेत. महसूल प्रशासन आणि वनविभाग यांचा या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना आशीर्वाद आहे का? असा प्रश्न जागरुक नागरिकांना पडला आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी गावाचे हद्दीमध्ये गट क्रमांक 88 येथे शेखाडी व भरडखोल या दरम्यान रस्त्याच्या डाव्या बाजूला एका बाहेरगावच्या धन दांडग्याने मोठमोठे बंगले उभे केले आहेत. हे बंगले पर्यटकांना भाडेतत्त्वावर देण्यासाठी उभे केलेले असून उंच डोंगरावरून समुद्र दिसत असल्यामुळे या बंगल्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अशाच प्रकारेच श्रीवर्धन तालुक्यातील आरावी व कोंडवील बीचवरती देखील मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. या रिसॉर्ट किंवा हॉटेलमध्ये जाण्यासाठी वन खात्याचा जागेचा सर्रासपणे वापर करण्यात आलेला आहे. मात्र, याबाबतीत वनविभाग मूग गिळून गप्प असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, अशी अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना महसूल प्रशासन आणि वनविभाग यांचा आशीर्वाद तर नाही ना? असा प्रश्न जागरुक नागरिकांना पडला आहे.
वनसंपत्ती धोक्यात
श्रीवर्धन तालुक्याला 52 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. मात्र, तालुक्यातील बहुतांश समुद्रकिनाऱ्यांच्या ठिकाणावरती सीआरझेड कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन करून बांधकामे उभी राहत आहेत. ही अनधिकृत बांधकाम करणारे बांधकाम करण्यासाठी नैसर्गिक डोंगरांचा ऱ्हास करत असून त्यामुळे या ठिकाणची वनसंपत्ती धोक्यात येत आहे. तरी महसूल प्रशासनाने व वन विभागाने सदर अनधिकृत बांधकाम करण्याऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.




