वन विभागाकडे तक्रार करूनही कारवाई करण्यास टाळाटाळ
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
एखाद्या शेतकऱ्याने वनजमिनीमध्ये गुरांसाठी गोठा बांधल्यास वन विभाग त्यांच्याविरोधात तात्काळ कारवाई करतात. मात्र मुरूड तालुक्यातील राजपूरी येथील खासगी वन जागेत काही कंपन्याचे अनधिकृत मोबाईल टॉवर उभारले जात आहेत. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करून ही वन विभाग कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी मुरूड तालुका संघटनेच्यावतीने ॲड. विनायक शेडगे यांच्याकडून करण्यात आला आहे.
वन परिक्षेत्र अधिकारी यांच्याकडून फक्त बघ्याची भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ॲड. शेडगे यांच्या तक्रारीनुसार, मुरूड तालुक्यातील राजपुरी येथील गट नं. 139/10 अ या महाराष्ट्र शासन खासगी वने असा शेरा असलेल्या जमिनीवर एअर टेल, कंपनीकडून अनधिकृत टॉवरचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. या मोबाईल टॉवरमधील अनावश्यक लहरीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भीती आहे. कोणतीही खातर जमा न करता, बेकायदेशीररित्या खासगी वन जमिनीमध्ये हे टॉवर उभारण्याचे काम सुरु केले आहे.
खासगी वनांच्या जमिनीचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र शासन खासगी वन अधिनियम 1975 हा खासगी जंगले, संपादन करण्यासाठी आणि खासगी वन जमिनीसंबंधित इतर बाबींची तरतूद करण्यासाठी हा कायदा केला आहे. परंतु, मुरूड तालुक्यातील राजपुरी येथील खासगी वन जमिनीवर धन दांडग्यांनी अतिक्रमण करून बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. या बांधकामाविरोधात मुरूडच्या वन परिक्षेत्र अधिकारी पॉल यांच्याकडे ॲड. शेडगे यांनी लेखी तक्रार केली असून, बांधकामास परवानगी दिली आहे, असा जाब विचारला आहे. मात्र, त्यांच्या म्हणण्यानुसार, वन परिक्षेत्र अधिकारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. वन संरक्षणाचे नियम धाब्यावर बसवून मोबाईल टॉवर उभारले जात आहे. मात्र, वन परिक्षेत्र अधिकारी यांच्याकडून कारवाईबाबत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ही कारवाई तातडीने न केल्यास आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी मार्फत कायदेशीर कारवाईसाठी न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा ॲड. शेडगे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
राजपुरी येथील जागेत टॉवर उभारणीचे काम होत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. ती जागा खासगी वन विभागाच्या अखत्यारित येते, असेही तक्रारीत नमूद केले आहे. संबंधित जागेची मोजणी करण्यासाठी भूमीअभिलेख विभागाकडे मागणी केली आहे. मोजणीनंतर जागा निश्चित करून संबंधिताविरोधात कारवाई केली जाईल.
-वर्षा पॉल,
वनपरिक्षेत्र अधिकारी, मुरूड
राजपुरी येथील गट नं. 139/10 अ या महाराष्ट्र शासन खासगी वने असा शेरा असलेल्या जमिनीवर एअर टेल, कंपनीकडून अनधिकृत टॉवरचे बांधकाम सुरु आहे. याबाबत वन परिक्षेत्र अधिकारी मुरूड यांच्याकडे लेखी तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, मोबाईल टॉवर अनधिकृत बांधकामाकडे दुर्लक्ष केले जात आहे. खासगी वन जागेत हे बांधकाम असून, त्याला कोणतीही परवानगी नाही. ही कारवाई लवकर झाली नाही, तर न्यायालयात दाद मागणार आहे.
-ॲड. विनायक शेडगे,
तक्रारदार





