कृषीवल दणका! आवास सरपंचाने रातोरात हटविले अनधिकृत घर

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील आवास येथील पांडवादेवी खार येथील शासकीय सार्वजनिक जागेत सरपंच अभिजित आणि त्यांचे बंधु रणजित राणे यांच्यासह तब्बल 10 जणांनी अतिक्रमण केल्याबाबतचे वृत्त कृषीवलने फोडून या गैरव्यवहाराला वाचा फोडताच कारवाई टाळून इभ्रत आणि आपले पद वाचविण्यासाठी सरपंचाने रातोरात होत्याचे नव्हते करीत आपले घर हटवले आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य महेंद्र कवळे यांनी समाधान व्यक्त केले.

कृषीवल

अलिबाग तालुक्यातील आवास ग्रामपंचायत हद्दीतील पांडवादेवी खार येथील कालवीची विहीर ते तन्नावाडीपर्यंतचा गावनकाशावरील व पुर्वांपार वहिवाटीचा आवास समुद्र किनार्‍यावरील रस्ता अडवून सरपंच अभिजित आणि त्यांचे बंधु रणजित राणे यांच्यासह तब्बल 10 जणांनी अतिक्रमण केले होते. याबाबत सारळ मंडळ अधिकारी यांच्यासमक्ष 3 जानेवारी 2022 रोजी लेखी स्वरुपात जबाब दाखल करण्यात आले होते. त्यानुसार अभिजीत आणि रणजित राणे नविन गट नंबर 552/1 जुना गट नंबर 1356-1, सर्व्हे नंबर 385-7 पैकी, तसेच रेमु झवेरी नविन गट नंबर 552/2 जुना गट नंबर 1356-3, सर्व्हे नंबर 385-7 पैकी, दिपक कल्याणजी तन्ना, समीर बांबोर्डेकर, निता तन्ना, बिंदु मेहता, अनिता देशमुख, जेरु लॉयर, मेहुल चौक्सी, आस्ताद पारख यांचा समावेश असल्याचे म्हटले होते.

या जबाबासह जुना व पुर्वापारचा गाव नकाशावरील रस्ता नमुद/उल्लेखाबाबतची कागदपत्रे देखील जोडून ही अनधिकृत बांधकामे त्वरीत हटवून रस्ता मोकळा करण्याची मागणी महेंद्र कवळे यांनी केली होती. तसेच सरपंच अभिजीत राणे यांनी स्वतः अतिक्रमण केल्याचे स्पष्ट होत असल्याने त्यांचे पद अवैध ठरवून त्यांना सरपंच पदावरुन हटविण्याची मागणी देखील त्यांनी केली असून यासंदर्भात लढा देण्याचा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला होता. या कृत्यावर कृषीवलने प्रकाश पाडून वाचा फोडण्याचे काम केले होते. त्यामुळे धाबे दणाणलेल्या सरपंच आणि मंडळींनी लागलीच रातोरात आपले अनधिकृत बांधकाम हटविले आहे. त्यामुळे गावात मोठया चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, अनधिकृत बांधकाम करणार्‍या सरपंचाने स्वतःहून राजिनामा देण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version