धुतुम परिसरात अनधिकृत पार्किंगचा सुळसुळाट

शासकीय अधिकारी वर्गाचा वरदहस्त
उरण | वार्ताहर |
उरण परिसरातील धुतुम परिसरातील मुख्य रस्त्यावर अनधिकृत पार्किंगचा सुळसुळाट झाला आहे. सदर पार्किंग या शासकीय जागेवरील खारफुटी नष्ट करून सुरू आहेत. याबाबत कोणतीच शासकीय यंत्रणा कारवाई करीत नसल्याने त्यांचे आर्थिक लागेबांधे असल्यानेच कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे.
उरणमधील धुतुम गावाजवळून मुख्य हायवे रस्ता जात आहे. तसेच या रस्त्यावरुन अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असते. तसेच कंपनी व गोदामे ही आहेत. परंतु, या ठिकाणी अवजड वाहनांना उभी करण्यासाठी अधिकृत पार्किंगची व्यवस्था नाही. तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात शासकीय जागा मोकळ्या आहेत. त्यामध्ये सिडको मंडळाच्या जागांचा अधिक आहेत.
या जागा मुख्य हायवे नजीक असल्याने मोकळ्या जागेवर असलेली खारफुटी खुलेआम तोडून त्याठिकाणी मातीचा भराव करून शेड उभ्या केल्या आहेत. त्यामध्ये गॅरेज, हॉटेल याचबरोबर बेकायदेशीर दारू व इतर नशीली पदार्थांची विक्री टपर्‍यांमधून केली जात असल्याने या ठिकाणी अवजड वाहनांकडून वसुली करून त्यांना पार्किंग करण्यास संमती दिली जात असल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून समजते.
अशा प्रकारे धुतुम परिसरात सिडकोच्या व इतर शासकीय जागेवर अनधिकृत पार्किंगचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. या अनधिकृत पार्किंगच्या माध्यमातून दिवसाला हजारों रुपयांची कमाई पार्किंग चालविणार्याला मिळत आहे. त्यातील ठराविक मलिंदा शासकीय अधिकारी वर्गाला दिला जात असल्यानेच त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत शासकीय यंत्रणा दाखवित नसल्याची चर्चा या परिसरात सुरू आहे.
धुतुम परिसरातील अनधिकृत पार्किंगवर कारवाई करण्यासाठी लवकरच सामाजिक संघटना पत्रव्यवहार करून पाठपुरावा करणार असल्याने अनधिकृत पार्किंगधारकांचे धाबे दणाणले आहे.

Exit mobile version