बांधकाम व्यावसायिकांना अनधिकृत नळजोडण्या
ग्रामपंचायत प्रशासक, अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या नेरळ ग्रामपंचायतीमध्ये पाणी वितरण व्यवस्था करताना आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचे दिसून येत आहेत. ममदापूर ग्रामपंचायतीची स्वतंत्र नळपाणी योजना असताना तेथे नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. तर, अनेक बांधकाम व्यावसायिकांना नळजोडण्या देऊन पाण्याचे वितरण केले जात आहे. मात्र, त्याची कोणतीही नोंद नेरळ ग्रामपंचायतीमध्ये दिसून येत नाही. दरम्यान, या गैरव्यवहाराबाबत नेरळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच, तथा पंचायत समितीचे सदस्य भगवान चंचे आणि ग्रामपंचायत माजी सदस्य प्रथमेश मोरे यांनी हा गैरव्यवहार उघडकीस आणला असून ग्रामपंचायत प्रशासक आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कर्जत तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली नेरळ ग्रामपंचायत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतीचा पाणी परस्पर बिल्डरांना दिला जात असल्याचा आरोप नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य भगवान चंचे व नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रथमेश मोरे यांनी आरोप केला आहे. नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील पाणी प्रश्न मागील काही दिवसांपासून तापला आहे. गावातील सामान्य नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना, दुसरीकडे बिल्डरांना बेकायदेशीरपणे आणि देणगी किंवा विनापावती पाणी जोडणी देऊन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा खळबळजनक आरोप स्थानिक नेत्यांनी केला आहे. ममदापूर ही स्वतंत्र ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीचे स्वतंत्र नळपाणी वीज आहे. असे असताना ममदापूर हद्दीतील काही बिल्डरांना नियमबाह्य पद्धतीने चार पाणी कनेक्शन देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, या कनेक्शनसाठी ग्रामपंचायतीकडे कोणतीही अधिकृत पावती किंवा पाणी जोडणी दिली असल्याची नोंद नाही. संबंधित बिल्डरांनी काही लाख रुपये घेतले असल्याचे बोलले जात असून ग्रामपंचायतीमध्ये त्या नळजोडण्यांची कोणतीही नोंद नाही. तसेच, कोणत्याही प्रकारचे निधी किंवा देणगी यांच्या खात्यात नोंद झालेली नाही. हा गैरव्यवहार करणाऱ्या ग्रामपंचायत मधील अधिकारी वर्गावर आणि संबंधित बिल्डर यांच्याकडून कशाआधारे पाणी जोडणी घेतली, याची माहिती कर्जत पंचायत समितीचे सदस्य भगवान चंचे यांनी उपस्थित केला.
तुलसी बिल्डर्ससारख्या मोठ्या प्रकल्पांना 25 पाणी जोडण्या देण्यात आल्या आहेत. नेरळ गावातील अनेक भागांत, मोहाचीवाडी आणि खांडा पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे. मात्र, हेच ग्रामपंचायत प्रशासन पाणी जोडण्या देऊन स्थानिक लोकांच्या हक्काचे पाणी पळवत असल्याचे दिसून आले आहे. त्याचवेळी बिल्डर लॉबीकडून पाणी उचलण्यासाठी चक्क विजेच्या मोटार लावल्याचे आढळून आले आहे. या सर्व बाबतीत कर्जत पंचायत समितीचे सदस्य भगवान चंचे आणि ग्रामपंचायत माजी सदस्य प्रथमेश मोरे यांनी नेरळ ग्रामपंचायतीमध्ये जाऊन प्रशासक सुजित धनगर आणि ग्रामपंचायत अधिकारी अरुण कार्ले यांची भेट घेऊन अनधिकृतपणे दिलेल्या नळजोडण्या यांची माहिती घेतली. त्यावेळी मागील काही महिन्यांत अनेक नळजोडण्या देण्यात आल्या असून त्यांची कोणतीही नोंद ग्रामपंचायतीकडे नाही. त्याचवेळी ग्रामपंचायतीकडे पूर्वी अनेक वर्षांपासून असलेले देणगी पावती पुस्तक यांत कोणत्याही प्रकारचे देणगी यांच्या नोंदी नाहीत. त्यावेळी अधिकृत पुस्तकांव्यतिरिक्त इतर खासगी पावती पुस्तके छापून वसुली केली जात असल्याचा संशय यावेळी व्यक्त करण्यात आला. एकीकडे नेरळ ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार सुरू असताना दुसरीकडे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी पैसे नसल्याचे कारण सांगितले जात आहे. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भगवान चंचे यांनी केला.
वरिष्ठ स्तरावरून चौकशीची मागणी
या सर्व गोंधळानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित बेकायदेशीर मोटारी जप्त करण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, नेरळमधील हा पाणी घोटाळा आता तालुक्यात चर्चेचा विषय ठरत असून, वरिष्ठ स्तरावरून याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. हा घोटाळा करणारे आणि स्वतःची तुंबडी भरणारे नामानिराळे राहणार नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होत असून नेरळ ग्रामपंचायतीमध्ये आणखी कोणता घोटाळा बाहेर निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, बेकायदा नळजोडणी घेणाऱ्या बिल्डर लॉबीवर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







