| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरान नगरपालिका हद्दीतील बेबी डिसूजा रोडवर काही बंकाही बंगलेधारकांनी परवानगीशिवाय रस्त्याचे बांधकाम सुरू केले आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या भागात मोठे अर्थकारण झाले आहे. पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे आणि येथे मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे.
माथेरान हे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्याने येथे कोणतेही काम करावयाचे असल्यास सर्वोच्च न्यायालयाने गठीत केलेल्या सनियंत्रण समितीची परवानगी घ्यावी लागते व त्यानंतरच कोणतीही कामे केली जातात. माथेरानमध्ये अनेक ठिकाणी प्रेक्षणीय स्थळांवरील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. येथील नागरिक अनेक वर्षांपासून हे रस्ते सुस्थितीत व्हावे याकरिता नगरपालिकेशी पत्र व्यवहार करीत आहेत, परंतु परवानगीच्या नावाखाली ही कामे रेंगाळली आहेत. परंतु, बेबी डिसूजा मार्गावरती खाजगी बंगलेधारकाने कायद्याची पायमल्ली करताना राजरोसपणे खोदकाम व रस्त्याचे काम सुरू केले आहे. विशेष म्हणजे वनविभागाकडून ही माती व दगड खोदकामास परवानगी नाही तरी ही या ठिकाणी जोरदारपणे रस्ता बनविला जात आहे व भराव ही टाकला जात आहे. या मार्गालगतच माथेरानचा मुख्य रस्ता असल्याने तेथून अधिकारी वर्गाची दररोजच ये-जा सुरू असते. तरी ही या कामावरती कोणाचाही आक्षेप झाला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. माथेरानच्या प्रवेशद्वारावर नगरपालिकेचा कर्मचारी तैनात असतो. पालिकेने परवानगी दिलेल्या कामासाठीच बांधकामाचे साहित्य पाठविले जाते. परंतु, या ठिकाणी कोणत्याही परवानगीशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य आलेच कसे व कोणाच्या हुकुमाने येत आहे. माथेरानमधील प्रस्थापित ठेकेदारच ही कामे करीत असल्याची माहिती समोर येत आहे.







