रॉयल्टी बंद असताना खुलेआम उत्खनन; महसूल खात्याचे दुर्लक्ष
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातून वाहणार्या उल्हास नदीचे लचके काढण्याचे काम वाळूमाफियांकडून सुरु आहेत. सध्या कर्जत तालुक्यात जागोजागी उल्हास, पोश्री नदीमध्येदेखील उत्खनन सुरु आहे. शासनाने रेती उत्खनन करण्यासाठी स्वामित्व शुल्क बंद केले आहे आणि त्यामुळे रेती उत्खनन अनधिकृतपणे केले जात असून, महसूल विभागाकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. दरम्यान, तालुक्यातील नद्या पोखरल्या जात असून महसूल खात्याच्या आशीर्वादाने हे सुरु आहे काय? असा सवाल पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.
शासनाने राज्यात रेती उत्खनन करण्यावर बंदी घातली आहे. मात्र, असे असताना कर्जत तालुक्यात रेती उत्खनन करण्याचे प्रमाण मोठे असून, उल्हास आणि पोश्री नदीमध्ये रेती उत्खनन दिवसाढवळ्या सुरु आहे. तालुक्याच्या मध्यभागातून उल्हास नदी वाहते आणि ही नदी ज्या भागात उगम पावते त्या भागातून सुरु होणारे रेती उत्खनन नदी ठाणे जिल्ह्यात प्रवेश करते त्या भागापर्यंत कायम आहे. उल्हास नदीच्या पात्रात काढली जाणारी वाळू ही कोणत्याही प्रकारचे स्वामित्व शुल्क कर भरून काढली जात नाही आणि त्यामुळे अनधिकृतपणे वाळू उत्खनन केले जात असताना महसूल विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दुसरीकडे महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने सर्व ठिकाणी केले जाणारे वाळू उत्खनन हे राजकीय आशीवार्दाने आणि सरकारी अधिकार्यांच्या आदेशाने सुरु असल्याचे बोलले जात आहे.
दिवसाढवळ्या वाळूमाफिया नद्या पोखरण्याचे काम करीत असून, कर्जत तालुक्यात महसूल विभागाचे तलाठी आठ-दहा गावांसाठी नेमलेले आहेत. आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मंडळ अधिकारीदेखील ग्रामीण भागात असतानाही अनधिकृतपणे तालुक्याच्या बहुसंख्य भागात माती आणि रेती उत्खनन सुरु आहे, अशी चर्चा आहे. महसूल खाते रेती उत्खनन होत असताना मूग गिळून गप्प असल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र, नदीमध्ये जेसीबी, पोकलेन मशीनचा वापर करून सुरु असलेले उत्खनन महसूल विभागाला दिसत नाही काय? असा सवाल पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.