पेण शहराला अनधिकृत टपर्‍यांचा विळखा

कारवाई करण्याचे मुख्याधिकार्‍यांचे आश्‍वासन
। पेण । संतोष पाटील ।
पेण नगरपालिकेतील प्रशासनाच्या दुर्लक्षाने शहरात अनधिकृत टपर्‍यांचा धंदा तेजीत सुरु असून,या टपर्‍यांचे भाडे नगरपालिकेचे कर्मचारी स्वतासाठीच वसूल करीत असल्याचे समोर आले आहे.यामुळे नपाला तोटा सहन करावा लागत आहे.शिवाय टपरीवाल्यांच्या अतिक्रमणांमुळे बकाल स्वरुप आलेले आहे.

दरम्यान, शहरातील अनधिकृत टपर्‍यांवर तातडीने कारवाई करण्याचे सुतोवाच मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी केले असून, येत्या आठ दिवसात अपेक्षित रिझल्ट दिसेल, असे त्यांनी सुचित केले आहे. पेण हे सूनियोजित शहर नव्हे तर ऐतिहासिक शहर असल्याने शहरातील अंतर्गत रस्ते हे रुंदीने छोटे आहेत. प्रशासनाने कितीही ठरविले तरी पेण शहरामध्ये रस्ता रुंदीकरण होऊ शकत नाहीत. ज्या काही ठिकाणी कमी-जास्त रस्ता रुंदीकरण झाले त्या ठिकाणी हातगाडीवाल्यांनी व टपरीवाल्यांनी अतिक्रमण करुन निम्मे रस्ते गिळंंकृत केले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे पेण शहराचा विचार करता आजमितीस 246 टपर्‍या व हातगाड्या अनधिकृतरित्या उभ्या आहेत.ए.टी.पाटील चौकापासून ते कोतवाल चौकापर्यंत (धरमतर रोड) रस्त्याच्या दुतर्फा टपर्‍या आणि हातगाड्यांनी रस्त्यावर अतिक्रमण

केले आहे. मोरेश्‍वर चित्रमंदिराच्यासमोर तर सतत वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण होतो. कारण मोरेश्‍वर चित्रमंदीराच्या भिंतीला लागून पुर्णत: अनधिकृत हातगाडया उभ्या आहेत. नगरपालिकेच्या मैदानाच्या व स्वीमिंग पूलमधल्या जागेत, चिंचपाडा प्रायव्हेट हायस्कूल रस्त्यावर, म्हाडा कुंभारआळी रस्त्यावर, भुंडापूल नंदीमाळ नाका रस्ता, आंबेगाव भोगावती पुल रस्ता ते चावडीनाका थिंमपार्क, म्हाडा कॉलनी, अंतोरा रोड ते कोतवाल चौक, राजूपोटे मार्ग, उर्दू शाळा ते नगरपालिका मैदान, छत्रपती संभाजी महाराज चौक या सर्व रस्त्यांवर आपल्याला अनधिकृत टपर्‍यांचे साम्राज्य पहायला मिळते. हे कमी होते काय तर पेण, कौंवडाळ तळयावर देखील सभोवताली टपर्‍या पहायला मिळतात. ज्या उद्देशाने कौंवडाळ तळयावरील 45 कुटुंबीयांना उठविले होते. तो उद्देश अशा अनधिकृत टपर्‍या उभ्या करुन पूर्ण झाले का? असा सवाल यानिमित्ताने नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरमहा पाच लाखांचा महसूल
एका टपरी मागे 2000 हजार रुपये महिन्याला भाडे आकारले जात आहे. जवळपास 4,92,000 रुपये भाडे कुणाच्या खिशात जाते, हा विचार करण्यासारखा प्रश्‍न आहे. टपरीधारकांना विचारल्यास ते कुणाचेही नाव सांगत नाही. कारण नाव सांगितले तर टपरी उठवतील. पेण नगरपालिका ठेकेदार या टपरी धारकांकडून दिवसाला 30 रुपयाप्रमाणे भाडे आकारुन पावती देते. हिच पावती टपरीधारक परवाना असल्यासारखे मिरवतात. एकंदरीत पेण शहरात रस्ते अरुंद होण्यामागे व वाहतूक कोंडी होण्यामागे या अनधिकृत टपर्‍या व हातगाडयांचा वाटा आहे. वेळेस या टपरीधारकांवर जर आळा घातला नाही तर बाप्पाची नगरी ही ओळख पुसून टपर्‍यांचे शहर म्हणून ओळखले जाऊ शकते.

पेण शहरामध्ये अनधिकृत टपर्‍यांचे प्रमाण वाढलेले आहे, हे करतो. येत्या आठ दिवसात या टपर्‍या धारकांना नोटीस देऊन टपर्‍या हलविण्यास सांगण्यात येईज. जर त्यांनी ते मान्य केले नाही तर पोलीस सरंक्षण घेऊन या टपर्‍या जेसीबीच्या सहाय्याने हलविल्या जातील. येत्या आठ दिवसात त्यावर ठोस उपाय करु. नगरपालिकेचे कर्मचारी या अनधिकृत टपरीधारकांना आर्थिक हितसंबंध ठेऊन मदत करीत असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

जीवन पाटील, मुख्याधिकारी

Exit mobile version