| अलिबाग | प्रतिनिधी |
भाजपमध्ये अलिकडेच प्रवेश केलेले दिलीप भोईर यांना अलिबागची विधान सभेची उमेदवारी मिळणार असल्याचे त्यांचे समर्थक सांगत असतात. पण बुधवारी याबाबत संदिग्ध भुमिका घेऊन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सगळ्या फुग्यांना टाचणी लावली.
भारतीय जनता पार्टीच्यावतीने अलिबागमध्ये बुधवारी संवाद सभा आयोजित केली होती. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार व खासदार कोण हवा अशी विचारणा कार्यकर्त्यांना केली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी दिलीप भोईर व धैर्यशील पाटील यांचे नाव सुचविले. त्यावर बावनकुळे म्हणाले की, हे माझ्या हातात नाही. केंद्रीय नेते व देवेंद्र फडणवीस याबाबत निर्णय घेणार आहेत. मी फक्त एबी फॉर्मवर सही करणार आहे.
दिलीप भोईर आमदार होण्याच्या इच्छेने सहा महिन्यांपूर्वी भाजपमध्ये गेले. कालच्या कार्यक्रमासाठी त्यांनी बराच खर्च केला असंही बोलले जातं. पण असे असूनही त्यांची उमेदवारी लटकलेली आहे हे काल स्पष्ट झाले आहे. वेगवेगळ्या भागातून आलेल्या कार्यकर्त्यांची ने-आण करण्यासाठी लाखो रुपये खर्च केल्याची चर्चा आहे. पण बावनकुळे यांच्या वक्तव्याने या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान भोईर यांचा जाहीर उल्लेख होत असताना, भाजपमध्ये गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेले व काही वर्षापासून भाजप उमेदवारीसाठी धडपत असलेले ॲड. महेश मोहिते यांचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महायुतीचे विद्यमान आमदार यांचे काय होणार, हा सवालही आता विचारला जात आहे.
दळवींची उमेदवारी अडचणीत विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार देण्याच्या हालचाली या कार्यक्रमातून सुरू झाल्या आहेत. अलिबाग विधानसभा मतदार संघातील महायुतीचे विद्यमान आमदार दळवी हे 2024 मध्येही इच्छुक असणार हे उघड आहे. मात्र भाजपचे दिलीप भोईर यांचे नाव पुढे आल्याने रस्सीखेच वाढणार आहे. भोईर यांना उमेदवारी मिळाली नाही, तरीही त्यांच्या नाराजीचा फटका बसण्याच्या शक्यतेमुळे शिंदे गटात चिंतेचे वाचावरण निर्माण झाले आहे.