। पटणा । वृत्तसंस्था ।
लोक जनशक्ती पार्टीमध्ये पडलेली वादाची ठिणगी आरपारच्या लढाईपर्यंत पोहोचली आहे. बंडखोर खासदारांनी मंगळवारी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावून चिराग पासवान यांना अध्यक्षपदावरून हटवले. त्यानंतर लगेचच चिराग यांनी पाचही बंडखोर खासदारांना पक्षातून काढून टाकले. काका-पुतण्याच्या दुश्मनीतून घडलेल्या या उलथापालथीमुळे बिहारचे राजकारण चांगलेच ढवळले आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जाहीर टीका करणाऱया चिराग पासवान यांना संसदीय पक्षनेते पदावरून हटवण्यासाठी त्यांचे काका पशुपती पारस यांच्यासह पाच खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून विनंती केली. त्यानंतर पशुपती पारस हे स्वतः संसदीय पक्षनेते बनले. त्यापाठोपाठ त्यांनी मंगळवारी तातडीने राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली. या बैठकीत चिराग यांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर लगेचच चिराग यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची व्हर्च्युअल बैठक बोलावली. तसेच बैठकीनंतर एक पत्र जारी करून बंडखोर खासदारांची पक्षातून हकालपट्टी केल्याची घोषणा केली. राष्ट्रीय कार्यकारिणी समितीने एकमताने पशुपती पारस, वीणा देवी, चौधरी महबूब अली पैसर, चंदन सिंह आणि प्रिन्स राज यांना पक्षातून तातडीने काढून टाकले आहे, असे पत्रातून जाहीर करण्यात आले.