शासकीय कार्यालयांना स्वच्छतेचे वावडे

। रोहा । प्रतिनिधी ।
2 ऑक्टोबर हा दिवस महात्मा गांधी यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. विद्यमान वर्ष हे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात असताना, गावागावात स्वच्छता राहावी, जनतेचे आरोग्य चांगले राहावे यासाठी जिल्ह्यातील सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासमवेत स्वच्छता संवादाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने रोहा तालुक्यातील शासकीय कार्यालये किती स्वच्छ आहेत. हे पाहण्यासाठी फेरफटका मारला असता शासकीय कार्यालयांना स्वच्छतेचे वावडे असल्याचे चित्र दिसून आले आहे.

स्वच्छता अभियान हे एक दिवसाचे काम नसून, यामध्ये सातत्य आवश्यक आहे.शाश्‍वत स्वच्छता राखण्यासाठी सर्वांनी स्वतःपासून सुरुवात करणे गरजेचे आहे. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक वापरावर बंदी,सार्वजनिक शौचालये व मुतारी यांची स्वच्छता व देखभाल, गावातील रस्ते व पाणवठे, शासकीय इमारतींची स्वच्छता या गोष्टीदेखील महत्त्वाच्या आहेत. पण, रोहा तालुक्यातील तहसीलदार, प्रांत कार्यालय, पोलीस ठाणे, वनविभाग व कोषागार कार्यालय, तालुका भूमी अभिलेख कार्यालय अशी विविध शासकीय इमारती असलेल्या प्रांगणात मात्र सर्वत्र झाडीझुडपे, उभे राहू शकणार नाही इतक्या खराब अवस्थेत असलेले शौचालय व मुतारी, पाण्याच्या टाकीच्या भोवती असलेले जंगल, रंग उडालेल्या भिंती, बेवारस वाहने आणि जप्त केलेल्या रेतीचे ढिगारे, पर्जन्यमापक यंत्राच्या बाजूला वाढलेले गवत असे विदारक चित्र पत्रकारांना पहावयास मिळाले. रोहा पं.स. कार्यालयाच्या परिसरातदेखील सर्वत्र घाणीचे साम्राज्य असल्याचे दिसून आले आहे.

तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत असा नावलौकिक असणार्‍या धाटाव ग्रामपंचायतीच्या कचरा व्यवस्थापन उपक्रमाला भेट दिली असता सदर उपक्रम बंद असल्याचे दिसून आले. सदर उपक्रम गणपती पासून बंद असल्याचे तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले. परंतु कचरा व्यवस्थापन व विल्हेवाट लावण्यासाठी आणलेल्या यंत्रसामग्री वरील बसलेली धूळ तसेच याच कार्यालयासमोर असलेला कचर्‍याचा ढिगारा त्यामध्ये पोटासाठी अन्न शोधत असलेली गुरे व आसमंतात पसरलेली दुर्गंधी मात्र काही वेगळेच सांगत होती. भविष्यात तालुक्यातील शासकीय कार्यालये प्रथम स्वतःचा परिसर स्वच्छ ठेवून तालुक्यातील जनतेला व लोकप्रतिनिधीना आदर्श घालून देतील, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

Exit mobile version