कंपनी व्यवस्थापनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी
खोपोली | संतोषी म्हात्रे |
वासरंग परिसरात पोलाद उत्पादन करीत असणाऱ्या महिंद्रा सनियो कारखान्यातील संतोष तोंडे कामगाराचे दि. 6 ऑगस्ट रोजी निधन झाले. या कामगाराला हदयविकाराचा झटका आला. संतोष बेशुद्ध झाला. मात्र त्यानेळी अँब्युलन्स नसल्याने कामगाराला दुचाकवरून रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकारामुळे कंपनी व्यवस्थापनाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशा मागणीचे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खोपोली शहर अध्यक्ष अनिल मिंडे यांनी खोपोली पोलिस ठाण्यात दिले आहे. तर कामगाराला दुचाकीवरून नेणारी व्हिडिओ पाहून सर्वांचे डोळे पाणावले.
संतोष तोंडे हा कामगार कारखान्यात काम करत असताना चक्कर येऊन पडला. कंपनी प्रशासनाने त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी कुठलीही व्यवस्था केली नसल्याने अन्य कामगारांनी बेशुध्द अवस्थेत दूचाकीवरून त्याला रुग्णालयात नेल्याचा व्हिडिओ सोशीयल मीडियावर व्हायरल झालाय. वेळीच उपचार न मिळाल्याने संतोष तोंडे या कामगाराला जीव गमवावा लागल्याचा आरोप मनसेने केला असून महिंद्रा सॅनियो कारखान्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसे अध्यक्ष अनिल मिंडे यांनी खोपोलीचे पोलिस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांना याबाबत निवेदन देवून केली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष सचिन कर्णूक, हुसेन शेख, सतिश येरूणकर, ईकबाल शेख, गणेश गाढवे धनंजय अमृते आणि नितेश खाडे उपस्थित होते.