अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धा टीम इंडिया विश्‍वविजेता

इंग्लंडला चारली धूळ
पाचव्यांदा विश्‍वचषकापवर कब्जा

। अँटिग्वा । वृत्तसंस्था ।

भारताचा युवा संघ पुन्हा एकदा अंडर 19 क्रिकेटमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. अँटिंग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात यश धुलच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या अंडर 19 टीमने इंग्लंडचा चार विकेट्स आणि 14 चेंडू राखून पराभव केला. विकेटकिपर दिनेश बानाने षटकार ठोकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
इंग्लंडने भारतासमोर विजयासाठी 190 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारताच्या युवा टीमने कुठलाही धोका न पत्करता संयमाने फलंदाजी करत हे लक्ष्य पार केलं. सामन्यात एकवेळ भारताची चार बाद 97 अशी स्थिती होती. त्यावेळी ऑलराऊंडर निशांत सिंधू आणि राज बावाने पाचव्या विकेटसाठी 67 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. निशांत सिंधू (50) धावांवर नाबाद राहिला, तर राज बावाने (35) धावा केल्या. या सामन्याचा नायक ठरला तो राज बावा. त्याने पाच विकेट्स आणि 35 धावा अशी अष्टपैलू कामगिरी केली.

कौतुकांचा वर्षाव
विश्‍वविजेत्या भारतीय युवा संघावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. एनसीए इनपुट हेड व्हीव्हीएस लक्ष्मणसह भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह यांनी विजेत्या संघाचे खास कौतुक केले. तसेच प्रत्येक खेळाडूला 40 लाख आणि सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला 25 लाखांचे बक्षीस जय शाह यांनी जाहीर केले आहे.

यश धुल ठरला पाचवा कर्णधार!
आयसीसीचा 19 वर्षांखालील विश्‍वचषक भारतीय संघाला मिळवून देणारा यश धुल हा पाचवा कर्णधार ठरला. यापूर्वी असा पराक्रम मो. कैफ (2000), विराट कोहली (2008), उन्मुक्त चंद (2012) आणि पृथ्वी शॉने (2018) गाजवला आहे.

विक्रमी कामगिरी
शेख रशिदने विश्‍वचषकात तीन अर्धशतके आपल्या नावे नोंद केली. त्याने फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध शानदार 50 धावांची खेळी केली. भारताकडून यश धुल हा यंदाच्या विश्‍वचषकामध्ये शतकवीर कर्णधार ठरला. यासह त्याने कर्णधाराच्या भूमिकेत भारताचा तिसरा शतकवीर होण्याचा पराक्रम गाजवला आहे.

Exit mobile version